खास प्रतिनिधी, नागपूर

दोन महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्य़ातील कसनासूर परिसरातील इंद्रावती नदीच्या परिसरात झालेल्या चकमकीत ३४ नक्षलवादी ठार झाले होते. त्यापैकी १८ जणांचे मृतदेह नदीत सापडले असून त्यांच्या शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाले आहेत. त्यात विषाचे अंश सापडले नसल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या मृत्यूचे कारणही स्पष्ट झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड तालुक्यात २२ एप्रिलला कसनासूर जंगलातील इंद्रावती नदीच्या परिसरात तर २३ एप्रिलला अहेरी तालुक्यातील नैनतर परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले होते. त्यापैकी ३४ जण कसनासूर चकमकीतील असून १८ मृतदेह नदीपात्रात सापडले होते. त्यावेळी पोलिसांनी अन्नातून विष देऊन नक्षलवाद्यांचा नरसंहार केल्याचा आरोप विविध संघटनानी केला होता. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहांचे शवविच्छेदन करून विसेरा रासायनिक प्रयोगशाळेकडे पाठवला होता. मृतदेहांवर गडचिरोलीतील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यात २० जणांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाचे अहवाल ५ मे ला पोलिसांना प्राप्त झाले होते. त्यात सात डॉक्टरांच्या चमूने सादर १२ जणांचा मृत्यू गोळ्या लागल्याने झाला.  त्यांच्या फुफ्फुस, डोके, छाती आदी भागांवर गोळ्या लागल्याच्या जखमा आहेत, तर चार जणांना गोळ्या लागल्या असल्या तरी त्यांचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाला आहे. मात्र उर्वरित चार जणांचा मृत्यू एकही गोळी न लागता केवळ पाण्यात बुडल्याने झाला, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते.

आता रासायनिक प्रयोगशाळेचेही अहवाल प्राप्त झाले असून त्यात नक्षलवाद्यांच्या शरीरात विष नव्हते, हे स्पष्ट केले. त्यामुळे गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे. त्याशिवाय नक्षलवाद्यांची ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए नमुनेही घेण्यात आले असून त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहे.

नक्षलवाद्यांकडून सापडले अनेक दस्तावेज

चकमकीच्या ठिकाणाहून पोलिसांना मोठय़ा प्रमाणात दस्तावेज सापडले आहेत. त्यात ३२ मेमरी कार्ड व अनेक डायरी नक्षलवाद्यांच्या मृतदेहाजवळून सापडल्या. गावकऱ्यांकडून मिळणाऱ्या सहकार्याचाही उल्लेख असून पेरमिली परिसरातील २५, गट्टेपल्लीतील आठ गावांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.