यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील कोविड केअर सेंटरमधून बुधवारी पलायन केलेल्या करोनाबाधित रूग्णास अखेर आज गुरूवारी सकाळी तालुक्यातील धामणी गावातून ताब्यात घेण्यात आले. सर्व कुटुंबच विलगीकरणात असल्याने घरी गोठ्यातील जनावरांना चारा-पाणी कोण घालत असेल, या विवंचनेतून हा रूग्ण पळून गेल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नवीनच समस्येला वाचा फुटली.

वणी तालुक्यातील राजूर येथील एका पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्याने मारेगाव तालुक्यातील नेत (वरूड) व कुंभा येथील काही लोकांना विलगीकरणात दाखल करण्यात आले. त्यांची करोनाचाचणी केल्यानंतर कुंभा येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनाने ही व्यक्ती राहत असलेला कुंभा येथील भाग प्रतिबंधित केला. त्याच्या संपर्कातील सर्वांना विलगीकरणात दाखल करण्यात आले. परिसरातील सधन शेतकरी असलेल्या या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंबच विलगीकरणात असल्याने घरातील जनावरांच्या चारा-पाण्याचे काय, या विवंचनेने तो उपचारांदरम्यान त्रस्त झाला. त्यातच जनावरांची सोय लावावी म्हणून संधी मिळताच तो विलगीकरण कक्षातून बुधवारी पहाटे पसार झाला. प्रशासनाला ही बाब कळताच तारांबळ उडाली.

या रूग्णाची तातडीने शोध मोहीम राबविण्यात आली. पळून गेलेला व्यक्ती गावकऱ्यांच्या धाकाने गावात मात्र गेला नाही. परिसरातील जंगलात त्याने रात्र काढली. सकाळी भूक लागल्याने धामणी शिवारातील एका गोठ्याजवळ तो पोहचला. तिथे दडून असताना शेतकऱ्याला तो दिसला. त्याने प्रशासनास ही माहिती दिली. अधिकारी, कर्मचारी, पोलीस तातडीने धामणी येथे पोहचले. तिथे या व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याला पुन्हा उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

पलायनानंतर तो कोणाकोणाच्या संपर्कात आला, कुठे गेला याचा शोध आता घेतला जात आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती, पुढील कारवाई पोलीस करतील, अशी माहिती मारेगावचे तहसीलदार दिपक पुंडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या रूग्णाच्या पलायनामुळे ग्रामीण भागात जे कुटुंबच्या कुटुंब विलगीकरणात आहेत, त्यांच्या घरी जनावरांची देखभाल कोणी करावी? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अंत्ययात्रेत सहभागी महिलेसह सात जणांविरूद्ध गुन्हा

वणी येथील तैली फैलातील एक महिला होम क्वारंटाइन असताना चिखलगाव येथे अंत्ययात्रेत सहभागी झाली. त्यानंतर ही महिला करोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाला अंत्ययात्रेत सहभागी सर्व ६४ जणांना विलगीकरणात दाखल करावे लागले. अखेर या महिलेविरोधात पोलिसांनी साथरोग प्रतिबंधक कायद्यासह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय हातावर विलगीकरणात राहण्याचा शिक्का असताना घराबाहेर फिरताना आढळलेल्या अन्य सात व्यक्तींविरोधातही या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.