राज्यात अनेक काळापासून विविध संघटना आणि व्यक्तींकडून संभाजी बिडीचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी होत होती. या मागणीला अखेर यश आले असून हे नाव बदलण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कंपनीचे संचालक संजय साबळे यांनी सांगितले.

साबळे म्हणाले, “संभाजी बिडी या कंपनीत ६० ते ७० हजार कामगार आहेत. या कंपनीला जवळपास ९० वर्षे झाली असून अनेक संघटनांच्या भावना लक्षात घेता आम्ही कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.”

“नव्या नावासाठी आम्ही चार ते पाच नावं सुचवली आहेत. कंपनीच्या नियमानुसार नव्या नावाला परवानगी मिळताच, लवकरच ते प्रसिद्ध केले जाईल. तसेच दरम्यानच्या काळात झालेल्या विरोधामुळे उत्पादनावर विपरित परिणाम झाला असून आता नाव बदलल्यानंतर आणखी परिणाम होण्याची शक्यता साबळे यांनी व्यक्त केली आहे.”

दरम्यान, चारच दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर थांबवण्याची मागणी केली होती. त्यांनी ट्विट करुन म्हटलं होतं, “छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा.”

तसेच आमदार नीतेश राणे यांनी देखील संभाजी महाराजांच्या नावाच्या वापरावर आक्षेप नोंदवला होता. त्यांनी ट्विट करुन म्हटलं होतं, “संभाजी राजेंचं नाव बिडीला देण्याचे धाडस आपल्या महाराष्ट्रात होतं इथेच आपण कमी पडलो! यांची आत्ताच हिंमत मोडली नाही तर उद्या अजून वाढेल…एकदाच धूर निघाला पाहिजे.. हर हर महादेव !!!”