शरद पवार यांच्या राजकारणातील मुत्सद्दीपणाच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण, राजकीय कारकिर्दीच्या सुरूवातीपासूनच पवारांनी सगळ्याच घटना हाताळण्याचं कसब मिळवलं. किल्लारीचा भूंकप असो, मुंबईतील बॉम्बस्फोट. हादरवून सोडणाऱ्या घटना पवारांनी अतिशय संवेदनशीलपणे आणि जबाबदारीनं हाताळल्या. आज शरद पवार ८०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पण, पन्नास-पंचावन्न वर्षांच्या काळात एकदा शरद पवार खोटं बोलले होते. १९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर पवार खोटं बोलले होते.

१९९२मध्ये शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री होते. आता दिल्लीतच राहायचं या विचारानं पवार कामाला लागले होते. त्याच काळात देशाला हादरवणारी एक घटना घडली. अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर देशासह मुंबईत मोठी दंगल उसळली. प्रचंड हिंसाचार सुरू होता. मुंबईत शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वानं शरद पवारांना महाराष्ट्रात पाठवलं. १९९३ मध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतली. मुख्यमंत्री होऊन पाच दिवस होत नाही, तोच १२ डिसेंबर १९९३ रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले.

एअर इंडिया बिल्डिंग, शिवसेना भवन, शेअर बाजार, सेंच्युरी बाजार, हॉटेल जुहू सेंटॉर, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, पासपोर्ट ऑफिस, काथा बाजार, हॉटेल सी रॉक, मुंबई विमानतळ या ११ ठिकाणी एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले. या हल्ल्यानंतर पवारांनी घटनास्थळांची तातडीनं पाहणी केली. त्यानंतर बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेल्या आरडीएक्सची माहिती घेतली. ते पाकिस्तानातील कराचीतून आणण्यात आलं होतं.

पण, मुंबईत ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले ते हिंदुबहुल होते. त्यामुळे मुस्लीम सुमदायाविरोधात रोष उफाळण्याची शक्यता होती. ही परिस्थिती अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याची जबाबदारी पवारांवर होती आणि पवारांनीही ती पार पाडली. बॉम्बस्फोटानंतर शरद पवार यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून जनतेला माहिती दिली. ही माहिती देताना पवारांनी जाणीवपूर्वक बॉम्बस्फोट बारा ठिकाणी झाल्याचं सांगितलं. त्यात मस्जिद बंदर या मुस्लीम भागातही स्फोट झाल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे ही घटना दोन धर्माविरूद्ध केलेला कट नसून भारताविरूद्धचा कट आहे, असंही पवार म्हणाले. पेटलेल्या मुंबईला पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी शरद पवार खोटं बोलले होते.