न्यायालयीन कामासाठी पुण्याहून नेवासे येथे आणण्यात आलेला खुनाच्या गुन्हय़ातील आरोपी शहरातील तीन क्रमांकाच्या बसस्थानकावरून (पुणे-मुंबई बसस्थानक) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. मंगळवारी रात्री ही घटना घडली.
याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की खुनाच्या गुन्हय़ातील सोपान भगवान गाडे (वय २८, रा. विवेकानंदनगर, नेवासे) हा येरवडा येथील कारागृहात बंदी होता. न्यायालयीन कामासाठी मंगळवारी त्याला एसटी बसने नेवाशाला आणण्यात आले होते. पुणे येथील पोलीस कॉन्स्टेबल मनोज लबडे हे त्याला घेऊन आले होते. न्यायालयाचे काम संपल्यानंतर ते सायंकाळी पुण्याकडे येत असताना या आरोपीने नगरच्या बसस्थानकावरून पलायन केले.
नेवासे येथून नेवासे फाटय़ापर्यंत रिक्षाने व तेथून नगरला खासगी वाहनाने आल्यानंतर पुण्याला जाण्यासाठी तिसऱ्या बसस्थानकावर आले असताना गाडे याने लघुशंकेचा बहाणा करून हातातील बेडीही तोडली व तो पळून गेला. लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजानान करेवाड करीत आहेत.