राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेले दुधकोंडी आंदोलन अखेर गुरुवारी मागे घेण्यात आले. दूध उत्पादकांना लिटरमागे किमान २५ रुपये भाव तसेच ५ रुपये रुपांतरीत अनुदान देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय अतिशय चांगला आणि योग्य आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि दुधकोंडी आंदोलनाचे निमंत्रक राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

शेट्टी म्हणाले, सरकारने घेतलेला निर्णय भविष्यातला एक दिर्घकालीन उपायोजनांचा भाग आहे. परराज्यातून आपल्याकडे येणारे दूध अनुदानित असते, या राज्यातील सरकारांच्या निर्णयाजवळ जाणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत आहे. सरकार यासाठी अभिनंदनास पात्र आहे. हे आंदोलन प्रतिष्ठेचे करण्याचे काहीही कारण नव्हते, शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा अशी आमची इच्छा होती. सरकारसोबतच्या चर्चेसाठी गिरीश (भाऊ) महाजनांनी यासाठी बरीच धावपळ केली.

यापूर्वी दूधावर देण्यात येणाऱ्या अनुदानाचा गैरफायदा होत होता. हे अनुदान लाटले जायचे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नव्हते. मात्र, सरकारने योग्य मार्ग काढत आजचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे दुधकोंडीचे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करीत उद्यापासून राज्यातील दूध पुरवठा सुरळीत होईल, असे शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सरकारने आपला निर्णय जाहीर करताना दूध संघांना ज्या अटी घातल्या आहेत, त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जाते की नाही याकडे आता आमचे लक्ष असणार आहे. आंदोलनादरम्यान, शेतकरी हिंसक झाले असले तरी त्यांच्यावर कारवाई व्हायला नको. शासनाने अशा चळवळींकडे आईच्या भुमिकेतून बघायला हवे, असे आवाहनही यावेळी राजू शेट्टींनी सरकारला केले. त्याचबरोबर केंद्र सरकार जर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असेल तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, यासाठी त्यांनी उद्यापर्यंत विचार करावा, अशी टिपण्णीही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली.