संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे देहूतील इनामदारवाड्यातून आज प्रस्थान झाले. देहूरोड येथून पालखी पिंपरी-चिंचवड अर्थात उद्योगनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पालखीचे निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात आगमन झाले. महापालिकेच्यावतीने भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. यावर्षी लोकप्रतिनिधींच्यावतीने दिंडी प्रमुखांना पावसापासून संरक्षणासाठी ताडपत्री भेट देण्यात आली.

दरम्यान, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल-रुक्मिनी मंदीरात होणार आहे. यावेळी निगडी-आकुर्डीतील नागरिकांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. तसेच विविध संस्थांनी वारकऱ्यासाठी पाणी, अन्न, फळांचे वाटप केले. आज सकाळी अनगड बाबा येथे पालखीची आरती झाली होती. त्यानंतर पालखीने निगडीकडे प्रस्थान केले. पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होते. शनिवारी विठ्ठल मंदिरातून पालखीचे पुण्याकडे प्रस्थान होणार आहे. पिंपरी-चिंचवड उद्योग नगरी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जयघोषाने दुदुमून गेली होती.