भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२१ रोजी हैदराबाद येथे झाला. नाटय़सृष्टीत ‘अण्णा’ नावाने ओळखले जाणारे पेंढारकर हे मराठी संगीत व गद्य रंगभूमीचा आधारवड होते. केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या ‘ललितकलादर्श’ नाटय़संस्थेची सूत्रे त्यांच्या पश्चात व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर (भालचंद्र पेंढारकर यांचे वडील) यांच्याकडे आली. व्यंकटेश पेंढारकर यांचे निधन झाल्यानंतर १९४२ मध्ये ‘ललितकलादर्श’ची जबाबदारी भालचंद्र पेंढारकर यांनी स्वीकारली.
सुरुवातीला कंपनीतर्फे ‘सत्तेचे गुलाम’, ‘भावबंधन’, ‘संगीत सोन्याचा कळस’ ही जुनी नाटके सादर करण्यात आली. ‘भावबंधन’मध्ये ‘लतिके’चे काम लता मंगेशकर यांनी केले होते. पण एकेकाळी गाजलेली ही नाटके त्या वेळी प्रेक्षकांना फारशी रुचली नाहीत. भालचंद्र पेंढारकर यांनी पु. भा. भावे यांनी लिहिलेले ‘स्वामिनी’ हे नाटक ‘ललितकलादर्श’तर्फे सादर केले. तेव्हापासून कंपनीची घोडदौड सुरू झाली.
‘ललितकलादर्श’तर्फे सादर झालेल्या पुढील नाटकांना रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला. कर्जबाजारी झालेल्या ‘ललितकलादर्श’ कंपनीला पेंढारकर यांनी पुन्हा सोन्याचे दिवस दाखविले.
भालचंद्र पेंढारकर यांनी ग्वाल्हेर घराण्याचे पं. रामकृष्ण बुवा वझे यांच्याकडून गाण्याचे धडे गिरविले होते. दमदार आवाज आणि गाण्याच्या जोरावर त्यांनी अनेक नाटकात नायकाच्या भूमिका केल्या. त्यांच्या कंपनीने सादर केलेल्या अनेक नाटकांनी हजार प्रयोगांचा पल्ला गाठला. विजया मेहता, दामू केंकरे, सुधा करमरकर, अरविंद देशपांडे, विजय तेंडुलकर आदींनी आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे या कंपनीतच गाठले. या मान्यवरांची सुरुवात ‘ललितकलादर्श’मधून झाली होती. विजय तेंडुलकर यांचे पहिले नाटक ‘झाला अनंत हनुमंत’ हे भालचंद्र पेंढारकर यांनीच ‘ललितकलादर्श’तर्फे सादर केले होते. याचे दिग्दर्शन अरविंद देशपांडे यांनी केले होते.
मिळालेले पुरस्कार
विष्णुदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, केशवराव भोसले पुरस्कार, संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार, तन्वीर सन्मान पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार
गाजलेली नाटके
दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, गीता गाती ज्ञानेश्वर, शाब्बास बिरबल शाब्बास, बावनखणी, जय जय गौरी शंकर, आनंदी गोपाळ, रक्त नको मज प्रेम हवे
गाजलेली गाणी
सप्तसूर झंकारित बोले (जय जय गौरी शंकर), नयन तुझे जादूगार (पंडितराज जगन्नाथ), मदनाची मंजिरी (पंडितराज जगन्नाथ), जय जय रमा रमण श्रीरंग (जय जय गौरीशंकर), घनश्याम मुरली (शाब्बास बिरबल शाब्बास), तू जपून टाक पाऊल (दुरितांचे तिमिर जावो), जय जय कुंज विहारी (शाब्बास बिरबल शाब्बास)