इचलकरंजी येथील एका व्यक्तीचा सीपीआरमध्ये काल मृत्यू झाला. काही काळात त्याचा अहवाल करोना पाॅझिटिव्ह आला.  यामुळे त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित नातेवाईक पूढे येईना. याबाबत इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते रवी जावळे यांनी काँग्रेस प्रदेश सचिव नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांच्याशी संपर्क साधला. कोल्हापूर जिल्हा बैतूलमाल कमिटीचे जाफरबाबा सय्यद यांनी तात्काळ तौफिक मुल्लाणी यांचेसमवेत राजू नदाफ, जाफर मलबारी, जावेद सनदी, जाफर महात यांना तात्काळ पंचगंगा स्मशानभूमीत जाण्यास सांगितले.

सीपीआर येथे मृतदेह शववाहीकेत ठेवण्यास दोन तास उशीर झाला. यावेळी कमिटीचे दोन सदस्यांनी सीपीआरमध्ये येऊन शववाहीकेत मृतदेह ठेवला. यावेळी जवळपास ४० ते ५० नातेवाईक उपस्थित होते पण करोना संसर्गाच्या भीतीमुळे कोणीही पूढे येण्याचे धाडस करत नव्हते.

आणखी वाचा- दिलासादायक बातमी… चंद्रपूर जिल्ह्यात १०० बाधित करोनातून बरे

स्मशानभूमीत राजू नदाफ,जाफर मलबारी व महानगरपालिकेचे दोन कर्मचारी अशा चौघांनी पीपीई कीट घालून हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.  काल राजापूर येथील मुस्लीम बांधवाचा दफनविधी केला होता आणि आज पंचगंगा स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करीत छत्रपती शाहू महाराजांच्या पूरोगामी विचारांची जपणूक करत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले,असे जिल्हा बैतूलमाल कमिटीने सांगितले.