आठ आमदार, एक खासदार, एक मंत्री असा बुलंद तोफखाना घेऊन उतरलेल्या भाजपा-शिवसेना-स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या महायुतीच्या आघाडीला जिल्हा बाजार समितीमध्ये यश मिळवण्याची नामी संधी आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळात बाजार समितीच्या प्रतिष्ठेला गरकारभाराने काळिमा फासली गेली हे चित्र बदलण्यासाठी महायुती िरगणात उतरली असली तरी नेतृत्वातील परस्परातील विसंवाद, प्रत्येकाचा स्वतंत्र अजेंडा, सोयीनुसार बदलणाऱ्या भूमिका या यशाच्या आड येणार असल्याने त्याला कितपत मुरड घातली जाणार यावरुन निकालाचे चित्र अवलंबून असणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका गोकुळ व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या दोन महत्त्वाच्या संस्थांची निवडणूक पार पडली. या निवडणुकांत अनुक्रमे काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडीक व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी आपले वर्चस्व कायम राखले. पण जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळविलेल्या महायुतीला सहकारात चंचूप्रवेश करणेही कठीण बनले गेले. गोकुळ व जिल्हा बँकेत शिवसेनेचे संचालक निवडले गेले तेच मुळी दोन्ही काँग्रेसच्या नेतृत्वाचा सोगा पकडून. दोन्ही निवडणुकीत महायुतीकडून आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. पण फारशी डाळ शिजलीच नाही. सहकारमंत्र्यांच्या जिल्ह्यात महायुतीला सहकारात शिरकाव करणे किती कठीण असते याची एव्हाना जाणीव झाली आहे.
हा अनुभव लक्षात घेऊन बाजार समितीच्या निवडणुकीत महायुती प्रथमच भगव्या झेंडय़ाखाली एकवटलेली आहे. बाजार समितीतील गेल्या काही वर्षांतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संचालकांचे गरकारभार, घोटाळे चांगलेच गाजले. साहजिकच त्यांची प्रतिमा खालावलेली आहे. यामुळे महायुतीला बाजार समितीत यश मिळवण्याची चांगलीच संधी चालून आली आहे. महायुतीकडे आठ आमदार, खासदार राजू शेट्टी आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील अशी मोठी ताकद एकवटलेली आहे. सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला भरभरुन यश मिळालेले असले तरी सहकारातील अपयश प्रकर्षांने उठून दिसणारे असल्याने हे गालबोट घालवून बाजार समितीवर भगवा फडकवण्याचा वज्रनिर्धार करण्यात आला आहे.
प्रचाराला प्रारंभ करताना महायुतीतील प्रमुखांनी झालेल्या चुकांची कबुली दिली आहे. गोकुळ, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या कळपात राहिलेले शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय मंडलिक यांनी बाजार समितीत महायुतीचा तंबू गाठला आहे. उशिरा सुधारणा केल्याचे निदान मंडलिकांनी केले असले तरी सामान्य शिवसनिकांना त्यांची सोयीनुसार भूमिका बदलण्याची पध्दत मानवलेली नाही. बाजार समितीतील गरव्यवहार विरोधात मंडलिकांनी टीकेची तोफ डागली असली तरी जिल्हा बँकेत सत्ताधाऱ्यांना साथ देताना त्यांना तेथील भ्रष्टाचार दिसला नाही का, असा सवालही उपस्थित होत आहे.  तर गोकुळच्या निवडणुकीत आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडीक यांच्या भूमिका कशा होत्या हेही महायुतीचे कार्यकत्रे जाणून आहेत. महायुतीच्या मंचावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात डरकाळ्या फोडल्या जात असल्या तरी छुपी युती कोणाकडून कशी होईल, याची साशंकताही जाणवत आहे. त्यामुळे बाजार समितीत महायुतीला यश हातात येईल अशी स्थिती असली तरी त्यांच्यातील अंतर्वरिोध कसा दूर होतो यावर बरेच काही अवलंबून आहे.