राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदपर्व सुरू होणार असल्याने, हा निर्णय घेतल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री, रयत क्रांती संघटनेचे नेते व भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आज जाहीर केला. २५ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी त्यांच्या शिवारामध्ये गुढी उभा करून हा आनंद व्यक्त करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. कृषी विधेयकवरून विरोधकांनी केंद्र शासनाच्या विरोधात ओरड सुरू केली असताना, सत्ताधारी गटाच्यावतीने मात्र याचे जल्लोषी स्वागत करण्याची तयारी सुरू केली आहे.

रविवारी सायंकाळी समाज माध्यमातून संवाद साधताना आमदार सदाभाऊ खोत यांनी केंद्र शासनाच्या विधेयकाचे स्वागत केले.शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक २०२० आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक २०२० ही दोन्ही विधेयक मंजूर करण्यात आली. या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचे सांगत त्यांनी त्याचे स्वागत केले.

विरोधकांवर हल्लाबोल –
काँग्रेसच्या सत्ताकाळामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक व्हावी, अशा पद्धतीची व्यवस्था राबवली गेली. बाजार समितीच्या एक तांत्रिक कारभारातून शेतकऱ्यांची लूट होत राहिली. अन्य सर्व क्षेत्रांमध्ये खुलेकरण करण्यात आले असताना, शेतकऱ्यांना मात्र त्याचा फायदा न देता बंधनाच्या जोखडात अडकवून त्याचे हित होणार नाही याची दक्षता घेतली. बाजार समितीच्या माध्यमातून राजकारण करून लाभ घेणाऱ्या विद्यमान सत्ताधाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी बाजार समितीचे समितीचा एकतंत्री कारभार मोडून काढून बाजाराचे खुलेकरण करण्याचा प्रयत्न मोडून काढला आणि शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली, असाही आरोप खोत यांनी केला.

काव्यात्मक टीका
केंद्र शासनाच्या या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाची पहाट येणार आहे. असे असताना त्याला विरोध करण्यामागे राजकीय कावेबाजपणा आहे. यासाठी खोत यांनी ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटातील ‘देहाची तिजोरी…’ गीताचा आधार घेत काव्यात्मक टीका केली.

‘पिते दूध डोळे मिटुनी, जात मांजराची..
मनीं चोरट्याच्या का रे, भीती चांदण्याची…
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा..

या ओळी म्हणत विरोधकांच्या मनात चांदणं असल्याने चोरांच्या सरावलेल्या हातांनाही चोरी करताना कापरं भरतं, असे नमूद करून विधेयकाचे आणि पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.