पाच वर्षांपासून काम प्रलंबित ; पुलाचा एक मार्ग डिसेंबरअखेरीस सुरू

सूर्या नदीवर उभारण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असून हा पूल कधी होणार याच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत. डिसेंबरअखेरीस या पुलावरून एक मार्गिका सुरू होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेला पूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि तारापूर येथील औद्योगिक वसाहत यांना जोडण्यासाठी नव्याने तयार होणार पूल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र या पुलाच्या उभारणीस अनेक अडचणी येत आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून राष्ट्रीय महामार्गावरील चिल्हार फाटय़ापासून औद्योगिक वसाहतीकडे येणाऱ्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत सूर्या नदीवर एकमेकांना लगत दोन मार्गिकांकरिता दोन स्वतंत्र पूल उभारण्याचे काम जून २०१४ मध्ये हाती घेण्यात आले. हे काम ३६ महिन्यांत म्हणजे जून २०१७ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र नदीच्या पात्रात सबस्ट्ररचे (बांधणी) काम करण्यास नदीमधील पाण्याच्या पातळीमुळे मर्यादा आल्या आहेत. तसेच पुलालगतच्या खासगी जागांचे अधिग्रहण करण्यास अडचणी आल्याने हे काम होण्यास विलंब झाला, असे संबंधित अधिकारी वर्गाचे म्हणणे आहे. एमआयडीसीने संबंधित ठेकेदाराला मे २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली असली तरीही अजूनही काम अपूर्ण अवस्थेत आहे.

साडेसात मीटर रुंदीच्या दोन मार्गिका (पदर) असणाऱ्या या पुलाची लांबी दीडशे मीटर असून उत्तरेकडील पुलाचे काँक्रीटीकरण तसेच गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या बाजूला असणाऱ्या रस्त्याचे काम व डांबरीकरण तसेच रस्त्याकडेला क्रॅश बॅरिएर टाकणे, गटार बांधणे इत्यादी कामे हाती घेण्यात आली असून ही सर्व कामे डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्र ओद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पुलाला जोडणाऱ्या रस्त्यावरील उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

नव्याने उभारण्यात येणाऱ्या दुसऱ्या मार्गिकेवरील पुलाचे दोन गर्डर (स्पॅन) टाकण्याचे काम शिल्लक असून अस्तित्वात असलेल्या जुना पूल आणि नव्याने उभारण्यात येणाऱ्या दक्षिणेकडील पुलांमध्ये दोन मीटर इतकेच अंतर आहे. जुन्या पुलाची संरक्षक भिंत नव्या पुलाच्या पायाअंतर्गत येत असल्याने दुसऱ्या पुलाच्या अखेरच्या टप्प्याचे काम रेंगाळले आहे. नव्याने उभारण्यात येणारा पहिला पूल कार्यरत झाल्यानंतर दुसऱ्या पुलाच्या अपूर्ण कामाला आरंभ करण्यात येणार असून नव्याने उभारण्यात येणारे दोन्ही पूल मे २०२०च्या अखेपर्यंत कार्यरत होतील, असे सांगण्यात आले.

अस्तित्वात असलेल्या पुलाची दुरुस्ती सध्या बोईसर-चिल्हार मार्गावर सूर्या नदीवर असलेला पूल जीर्ण झाला असून या पुलाच्या दुरुस्तीसाठी व्हीजेटीआय या संस्थेचा सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे. या संस्थेच्या अभियांत्रिकी आणि पुलाची पाहणी केली असून या पुलाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नदीपात्रात पुलाच्या उभारणीचे काम सुरू असल्याने अनेक अडचणी येत असतात. सध्या पुलाचे ७० ते ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मे २०२०पर्यंत दोन्ही पूल व मार्गिका वाहतुकीसाठी खुले होतील. एका पुलाचे काम डिसेंबरअखेरीस पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न आहे. – राजेंद्र तोतला, उपमुख्य कार्यकारी अभियंता, औद्योगिक विकास महामंडळ, तारापूर