वैयक्तिक शौचालयासाठी अनुदानाचा लाभ मिळणार नाही

वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी केंद्र शासनाकडून देण्यात येणारा निधी येत्या ३१ डिसेंबर २०१९ नंतर बंद होणार आहे. त्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची शक्यता नसल्याने लाभार्थ्यांनी ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन अकोला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

कुटुंबाला शौचालयासाठी १२ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. मात्र, आता ३१ डिसेंबरनंतर शौचालय बांधकामाचे हे १२ हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देणे बंद होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शासनाने ‘हागणदारीमुक्त गाव’ करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. हागणदारीमुक्त गावांना रोख रक्कम देऊन पुरस्कार देण्यात आले आहेत. गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी गावातील नागरिकांसह सचिवांवर जबाबदारी देण्यात आली आहे. अजूनही गावात ज्यांच्याकडे शौचालये नाहीत, अशा कुटुंबांना शौचालय बांधणीसाठी ३१ डिसेंबपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पूर्वी योजनेचा लाभ घेतला नसल्यास आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे स्वमालकीची जागा असावी, शौचालय दोन खड्डय़ाचे असणे गरजेचे आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने सन २०१२ साली जिल्ह्यतील शौचालय नसलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. सन २०१२च्या बेसलाईन सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांचा पुन्हा एकदा सर्वेक्षण करून वैयक्तिक शौचालय नसलेल्या अशा सर्व कुटुंबांनी शौचालय बांधकाम करण्याचा परिपूर्ण प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. गावातील कोणतेही पात्र कुटुंब वैयक्तिक शौचालय विना राहू नये, यासाठी गावातील नागरिकांनी व ग्रा.पं.सचिव यांनी पुढाकार घ्यावा. आपल्या कृतीमुळे आपले गाव, आपला तालुका व आपला जिल्हा खऱ्या अर्थाने हागणदारीमुक्त होऊ  शकणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी ग्रामसेवकाच्या मदतीने नावांची नोंदणी पंचायत समितीमध्ये करावी. तसेच केंद्र सरकारच्या संकेतस्थळावरील माहिती प्रणालीमध्ये सुद्धा नोंद करून घ्यावी, असे आवाहन आयुष प्रसाद यांनी केले आहे.