सध्या देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा अधिकच सतर्क झाल्या असून, सर्वोतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच प्रत्यय वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका कुटुंबाला व इतरांनाही आला. दहा वर्षांच्या मुलाने विरंगुळा म्हणून वडिलांच्या मोबाईलमधील ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप उघडले यानंतर यातील सर्व प्रश्नांना होकारार्थी उत्तर दिली आणि त्यानंतर त्याच्यासह संपूर्ण परिवारावर सात दिवस विलगीकरणात राहण्याची वेळ आली.

ही घटना आर्वी येथील एका सधन कुटुंबात घडली आहे. या कुटुंबातील दहा वर्षीय मुलाने सहज म्हणून वडिलांचा मोबाईल हाताळायला घेतला. त्यानंतर त्याने मोबाईलमधील सर्व अ‍ॅप उघडण्यास सुरूवात केली. यातील आरोग्य सेतू अ‍ॅप देखील त्याने उघडले. त्यानंतर त्यातील सर्व प्रश्नांचे होय असे उत्तर दिले. मात्र याची लगचेच ऑनलाइन दखल घेण्यात आली. या अ‍ॅपचे दिल्ली कनेक्शन असल्याने सुत्रं जलगतीने हलली व तेथून राज्यातील प्रशासनास सूचना करण्यात आली. त्यानुसार जिल्हा पातळीवर ही सूचना आल्यानंतर संबंधित घरी शासकीय कर्मचारी पोहोचले.

आणखी वाचा- वर्धा : करोनाबाधित उपजिल्हाधिकाऱ्यांनी क्वारंटाइनचा नियम मोडला; प्रशासनाची वाढली डोकेदुखी

तोपर्यंत आपल्या मुलाने नेमका काय प्रताप केलेला आहे, याबाबत त्याच्या वडिलांना पुसटशी देखील कल्पना नव्हती. दारात आलेले कर्मचारी पाहिल्यावर व त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून ते चकीत झाले. आमच्या घरात सर्वजण ठणठणीत असल्याचे त्यांना कर्मचाऱ्यांना वारंवार सांगितले. मात्र, त्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा खुलासा अमान्य करीत त्यांना सात दिवस गृह विलगीकरणात राहण्यास बजावले. आरोग्य विभागाच्या नियमावलीनूसार हे आवश्यक असल्याचे सांगण्यात आल्याने कुटूंबाचा निरूपाय झाला. सर्व सदस्यांना विलगीकरणात राहण्याची आपत्ती ओढवली. दहा वर्षीय मुलाचा विरंगुळा कुटूंबास मात्र चांगलाच मनस्ताप देणारा ठरला.