उमरगा शहर व तालुक्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टिने संपूर्ण शहर जलमय झाले असून, शिवारातील बांध फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आत्तापर्यंतच्या इतिहासात उमरगा महसूल मंङळात २०८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. शहरातील जवळपास दोनशे घरात पाणी घुसल्याने संसारोपयी साहित्यांचे मोठे नुकसान झाले असून शेत शिवारातून आलेल्या पावसाचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर थांबल्याने मध्यरात्री दोननंतर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

उमरगा मंडळ विभागात सर्वाधिक २०८ मिलीमीटर पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शहरातील ओ. के. पाटील नगर भागात मोठ्या नालीचे बांधकाम नसल्यान उमरगा नाल्यापर्यंत पाणी पोहचू शकले नाही. परिणामी पाणी दत्त मंदिर परिसरात घुसले तसेच राष्ट्रीय महामार्गावर गुंजोटी मोड ते मोरे कॉम्पलेक्सपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून गुडघाभर पाणी वाहत होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी कुणीही धोका पत्कारायला तयार नव्हते. त्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती. पहाटेपासून सकाळी अकरापर्यत पाणी वाहतच होते. पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने संथ गतीने वाहतूक सुरू होती. सकाळच्या वेळी पाण्याखालील खङ्ङ्यांचा अंदाज न आल्याने चार दुचाकीचालक पडले.

मदनानंद कॉलनीतील अनेक घरात व दुकानात पाणी शिरल्याने घरगुती वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. या कॉलनीतील भिमा रावसाहेब चव्हाण यांचे तात्पुरत्या स्वरूपातील घर व दुकान पाण्यात वाहून गेले आहे. रात्रीच्या सुमारास घरात अडकेल्या नऊ व्यक्तींना शेजारी असलेल्या शेरू पठाण यांनी मोठ्या कसरतीने दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढले. शहरातील मलंग प्लॉटमध्ये तलावासारखी स्थिती निर्माण झाली. तेथील पाण्याचा मोठा प्रवाह मुन्शी प्लॉट, साने गुरुजी नगर, पतंगे रोड भागातील घरात घुसल्याने नागरिकांना मध्यरात्रीपासून बाहेर थांबावे लागले. दरम्यान अतिवृष्टीने शेतीचे बांध फुटून मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील मंडळनिहाय पाऊस :

उमरगा – २०८ मीमी, मुरुम (६७), दाळींब (१६०), मुळज (१३०), नारंगवाडी (१०४) एकूण सरासरी पाऊस १३३.०८ मीमी इतका झाला.

तुळजापूर, लोहारा, उस्मानाबादमध्येही पाऊस :

उमरग्याशिवाय लोहारा, तुळजापूर तसेच उस्मानाबाद तालुक्यातही चांगला पाऊस झाला आहे. तुळजापूर मंडळात ६६ मीमी, सावरगाव (७१), नळदूर्ग (६५), सलगरा (७०), पाडोळी (८०), लोहारा (९५), जेवळी (७५) आदी मंडळात अतिवृष्टी झाली आहे.