राज्याला ३५ हजार कोटींचा फटका बसला असून जीएसटी परताव्यापोटी तसेच केंद्रीय कराच्या हिश्यापोटी संपूर्ण रक्कम लवकरात लवकर मिळावी म्हणजे करोनाच्या या संकट काळात मदत होऊ शकेल अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत केली आहे.

कंटेनमेंट क्षेत्राकडे अधिक काटेकोर लक्ष देण्यात येत असून लॉकडाउनची अधिक कठोर अंमलबजावणी सुरु आहे. तसंच महाराष्टात करोना चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. नेहरू सायन्स सेंटर, रेसकोर्स मैदान, वांद्रा-कुर्ला संकुल, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर येथे विलगीकरणाची, उपचाराची व्यवस्था केल्याचीही माहिती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.

करोनाचा प्रतिबंध करणारे औषध बनविणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देऊन ते तयार करण्यात पुढाकार घेतल्यास उपयोग होईल असेही ते म्हणाले. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी माफ करावा तसेच काही संस्था उपकरणे आयात करीत आहेत सीमा शुल्कात सवलत द्यावी असेही ते म्हणाले. मुंबई-पुणे सारखा तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स देशाच्या पातळीवर तयार करून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तो संपर्कात राहील असे पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

आवश्यकता भासल्यास मनुष्यबळ द्यावे

केंद्रीय आरोग्य पथकांनी मुंबई-पुणे येथे भेटी दिल्या असून उपयुक्त सूचना केल्या आहेत. आमचे पूर्ण सहकार्य असेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. विशेषत: पोलिसांना मधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे , त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचे काम आहे ते आजारी पडून चालणार नाही त्यामुळे आवश्यकता भासेल तसे केंद्र सरकारने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल.