करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही हजारो कामगारांचा आणि परिसरातील लाखो लोकांच्या जीवाची पर्वा न करता काम सुरु ठेऊन उत्पादन घेणाऱ्या विराज प्रोफाइल प्रा. लिमिटेड या तारापूर येथील कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला. या कंपनीच्या सर्व चार कारखान्यांमधील उत्पादन बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

लॉकडाउन आणि संचारबंदीच्या काळात उत्पादन प्रक्रिया उद्योगांना शासनाने दिलेल्या सवलतींचा लाभ घेऊन विराज प्रोफाइल लिमिटेड या कंपनीने आपले उत्पादन तारापूरमध्ये सुरू ठेवले होते. एकीकडे इस्पात उद्योगातील इतर नामांकित उद्योगांनी आपले उत्पादन बंद ठेवले असताना विराज कंपनीने शासनाची दिशाभूल करून उत्पादन सुरू ठेवण्याच्या व खबरदारीच्या आवश्यक उपाययोजनांचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीला या उद्योगातील पाहणी करण्यासाठी पाठवले होते.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर किमान मनुष्यबळामध्ये उत्पादन सुरू ठेवणे, कामगारांच्या आरोग्य व स्वच्छतेच्यादृष्टीने पुरेशा प्रमाणात सुविधा नसल्याने, करोनाचा संसर्ग व पादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना या उद्योगाने केल्या नसल्याचे समितीने दिलेला अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये कामगारांना हात धुण्यासाठी साबण व इतर सुविधा उपलब्ध करून देणे, हँडवॉश पुरेशा प्रमाणात ठेवले, स्टाफच्या व्यवस्थेमधील किमान अंतर न राखणे, सामाजिक अंतर राखण्याबाबत प्रवेशद्वार व हजेरी काऊंटरवर आवश्यक फूट मार्क अंमलबजावणी न करणे, कामगारांना आत-बाहेर येण्यासाठी वेटिंग फूट मार्कची सुविधा न करणे, दररोज तपासणी केलेल्या कामगारांची व अधिकारी वर्गाच्या नोंदणी न ठेवणे, कॅन्टीन व होस्टेल परिसरात करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी व प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आवश्यक पोस्टर-संदेश न लावणे तसेच अपुऱ्या वाहन व्यवस्थेमुळे कामगारांना गर्दीतून प्रवास करणे भाग पडणे आदी कारणं शासनाने सांगितली आहेत.

आणखी वाचा- लॉकडाउनमध्ये जिल्हा बंदीचा आदेश मोडणाऱ्या उद्योगपतीसह कुटुंबीय, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

शासनाच्या आदेशांचे पालन न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र covid-19 उपाययोजना नियम २०२० साथीचा रोग कायदा १८५७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार विराज प्रोफाइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या औद्योगिक वसाहतीमधील दोन तसेच मान व महागाव ग्रामपंचायत हद्दीतील इतर दोन केंद्राला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले.