गुंतवणुकीवर मोठ्या रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून सव्वाशे पेक्षा अधिक महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जयपूरस्थित कंपनीच्या तिघा चालकांना गुरुवारी येथील न्यायालयाने सात वर्षांची कारावासाची व प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

याबाबत संगीता संजय लोखंडे व सुमारे १२५ महिलांना शाईन मल्टीट्रेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जयपूर या कंपनीचे चालक आनंद शिवराम तांबे (वय ४८, कल्याण ठाणे), भूपसिंग सूरग्यान सिंग (वय ४०, नवी दिल्ली) व मोहन अर्जुन केसवानी (वय ५९, जयपुर) या शिक्षा झालेल्या तिघांसह या कंपनीचे महाराष्ट्रातील प्रतिनिधी आनंद शिवराव तांबे व सुनील यशवंत घाडगे यांनी संगनमताने गुंतवणूक रकमेवर मोठ्या रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून बँकेत गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. ही रक्कम परत न मिळाल्याने महिलांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपींविरुद्ध बाराशे पानाचे दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते.

पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच प्रकरण
विशेष न्यायाधीश बी. डी . शेळके यांच्या न्यायालयात तीन वर्ष कामकाज चालले. १४ साक्षीदार, फिर्यादी महिला, सहायक सरकारी वकील समिउल्ला पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ आणि प्राईज चीट अँड मनी सर्क्युलेशन स्कीम ॲक्टमधील कलमाखाली गुणदोषावर खटला चालवून शिक्षा होण्याची पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिलेच प्रकरण आहे.