सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात देशभरात एकीकडे ठिकठिकाणी निदर्शने केली जात असताना, दुसरीकडे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात आज सकाळी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी देखील उपस्थिती लावली. याप्रसंगी माध्यांना प्रतिक्रिया देताना, हा कायदा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, मात्र काही राजकीय पक्ष लोकांची माथी भडकवू देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ संपूर्ण नागपूरकर एकवटले आहेत. देशाच्या हितासाठी व कोणत्याही समाजाच्या, धर्माच्या विरोधात नसलेलं अशाप्रकारचं हे विधेयक आणि कायदा आहे. मात्र, काही राजकीय पक्ष जाणीवपुर्वक लोकांना भडकवून, लोकांची माथी फिरवून आपल्या देशात एक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, देश सुधारित नागरिकत्व कायद्याच्या सोबत आहे, त्यामुळेच हे समर्थन आपल्याला दिसत आहे, असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांसह विविध संघटना व नागरिकांचा या मोर्चात मोठा सहभाग दिसून आला. मोर्चा संविधान चौकात पोहचल्यानंतर या ठिकाणी त्याचे रुपांतर सभेत झाले. या सभेस केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले.

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) बद्दल जनजागृती करण्यासाठी भाजपाकडून आता विशेष दहा दिवसीय अभियान राबवले जाणार आहे. देशभर चालवल्या जाणाऱ्या अभियानातंर्गत तीन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांशी संपर्क साधला जाणार आहे. भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी याबाबत शनिवारी माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप केला आहे.