अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने अक्षरशा धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. या निकालानंतर आता देशभरातून विशेष करून राजकीय वर्तुळातून पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टिप्पणी केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी गृहमंत्री अमित शाह राजीनामा कधी देणार? असा सवाल केला आहे.

Assembly Election Results 2021: भाजपा विरोधकांचा ममता दीदींवर कौतुकाचा वर्षाव

” जेव्हा निवडणूक सुरू होती, भाजपाकडून विशेषकरून अमित शाह दावा करत होते की आम्हाला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील. निकाल पूर्णपणे उलटा आहे. निवडणूक कालावधीत जेव्हा बंगालमध्ये हिंसाचार झाला, तेव्हा केंद्रीय सुरक्षा दलाने सहा लोकांना मारण्याचं काम केलं. ममता बॅनर्जींनी अमित शाह यांचा राजीनामा मागितला होता. तेव्हा अमित शाह म्हणत होते की, मी त्यांच्या मागण्यावर राजीनामा देणार नाही. जनतेने मागणी केली तर राजीनामा देईल. एवढा मोठा पराभव याचा अर्थ जनता तुम्हाला राजीनामा मागत आहे. अमित शाह राजीनामा कधी देणार हे देश जाणू इच्छित आहे.” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

बंगालमध्ये ममताच!

पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ या राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका आणि देशातील पोटनिवडणुकांची मतमोजणी रविवारी झाली. करोना प्रतिबंधक नियमांच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून संथगतीने मतमोजणी सुरू होती. तब्बल आठ टप्प्यांत मतदान पार पाडलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आदींच्या झंझावाती प्रचाराचे केंद्र ठरलेल्या बंगालच्या निकालाबाबत सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. बंगालमध्ये भाजपा तृणमूल काँगे्रसला कडवी लढत देईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनीही वर्तवला होता. मात्र, मतमोजणी सुरू होताच हा अंदाज खोटा ठरवत तृणमूल काँगे्रसने मारलेली मुसंडी अखेरपर्यंत कायम राखली.

याचबरोबर, ”निवडणुकीत मोकळी सूट देण्यात आली, संपूर्ण देशात करोनाचा पसरण्यासाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे! आम्हाला वाटतं की, सर्वोच्च न्यायालायने याची देखील स्वतंत्र सुनावणी करावी.” असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना नवाब मलिक म्हणले की, ”लस निर्माण करणाऱ्या कंपन्या स्वतःला असहाय्य म्हणत आहेत. लशींची उपलब्धता नाही. जगात जर कुठला देश लस निर्माण करत असेल, तर अशा लशींची परवानगी देखील केंद्र सरकारने द्यायला हवी.” असं म्हटलं आहे.