शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत गोडाऊन मालकाचा मृतदेह सोमवारी पोलिसांना कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर आढळून आला. प्रकाश कडुबा कासारे (वय 48, रा. मुकुंदवाडी) असं या मालकाचं नाव आहे. मृतदेहाच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा आहेत. तसेच प्रकाश कडुबा कासारे हे भारतीय दलित पँथरचे शहराध्यक्ष असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कासारे हे रविवारी मित्राची इंडिगो कार घेऊन निघाले होते. ते रात्री उशिरापर्यंत न पोहचल्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलगा त्यांना फोन करत होते. पण कासारे यांच्याकडून काहीही प्रतिसाद आला नाही. सोमवारी सकाळी 10.30 च्या सुमारास शेंद्रा परिसरात त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी कासारे यांच्या पत्नीला आणि मुलाला यासंदर्भातली माहिती दिली. मृतदेहाच्या गळ्याजवळ हाताने आवळल्याचा खुणा आहेत. कासारे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कारण कळू शकेल असे पोलिसांनी म्हटले आहे.
First Published on February 11, 2019 8:44 pm