27 September 2020

News Flash

सृजनक्काचा मृत्यू नक्षल चळवळीसाठी धक्कादायक

नक्षलवादग्रस्त अतिदुर्गम भागातील खबऱ्यांचे जाळे पोलिसांच्या यशाचे गमक

प्रतिकात्मक छायाचित्र

नक्षलवादग्रस्त अतिदुर्गम भागात पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी खबऱ्यांचे घट्ट विणलेले जाळे, त्यांच्याकडून मिळालेल्या प्रत्येक माहितीचा अतिशय चपखल उपयोग करून घेत नक्षलींना त्यांच्याच जाळ्यात अडकविल्याने जहाल नक्षलवादी तथा कसनसूर दलम डिव्हीसी सृजनक्का उर्फ चिनक्का उर्फ जैनी चैतु अर्का (४८) हिला चकमकीत ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाला यश आले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने मागील चार ते पाच वर्षात अतिदुर्गम नक्षलवादग्रस्त भागात खबऱ्यांचे चांगले जाळे विणले आहे. विशेष म्हणजे पोलीसांची या खबऱ्यांवर मेहरनजर आहे. त्यातूनच या खबऱ्यांना तयार करण्यात आले आहे. हे खबरी नक्षलग्रस्त भागातील इत्तमभूत माहिती पोलीसांपर्यंत पोहचवित आहेत. नक्षल चकमकीच्या मागील काही घटना बघितल्या तर त्यातून खबऱ्यांचे स्वतंत्र नेटवर्क या भागात कार्यान्वित झाले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याच खबऱ्यांच्या माध्यमातून आता पोलिसांनी नक्षलवाद्यांना टिपण्याचे काम सुरू केले आहे.

खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच निर्मलाकुमारी उर्फ नर्मदा हिच्यासारख्या जहाल नक्षलीसह २२ जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलीसांना यश आले. तेच नाही तर एके-47 सह आत्मसमर्पण करणाऱ्या जहाल नक्षली विलास कोल्हासह वर्षेभरात ३५ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, वर्षेभरात ९ नक्षलवाद्यांचा केलेला खात्मा असे अभूतपूर्व यश गडचिरोली पोलिसांना मिळाले आहे.एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी हद्दीतील मौजा सिनभट्टीच्या जंगलात जहाल नक्षली सृजनक्का असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यातूनच नक्षल विरोधी पथकाने अतिशय नियोजनबध्द पध्दतीने अभियानाला सुरूवात केली. त्यात चकमक झाली असता पोलीस जवानांचा दबाव बघून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेवून पळून गेले. मात्र यावेळी झालेल्या गोळीबारात सृजनक्काच पोलिसांचे लक्ष्य ठरली. यात ती मारल्या गेली.

सृजनक्का ही १९८८ मध्ये भामरागड दलममध्ये दाखल झाली होती. तिच्यावर गडचिरोली जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात १४४ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने तिच्यावर १६ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. या चकमकीच्या वेळी तिचेजवळ एके-47 रायफल होती. परंतु पोलिसांसमोर ती त्या आधुनिक रायफलीचा उपयोग करू शकली नाही. तसेच प्रेशर कुकर, क्लेमोर माईन सुद्धा पोलिसांना मिळाले. पोलिसांनी तेथील संपूर्ण नक्षल शिबिरचं उध्वस्त केले. सृजनक्काच्या मृत्युमुळे नक्षल चळवळीस मोठा हादरा बसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2020 8:12 pm

Web Title: the death of srijanakka is shocking for the naxal movement msr 87
Next Stories
1 सामान्य माणूस रस्त्यावर येईल आणि उद्रेक होईल; माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा इशारा
2 चंद्रपूर : उत्तर प्रदेशातील 307 मजुरांना जिल्हा प्रशासनाने केले रवाना..
3 वर्धा : दोनशे पेक्षा अधिक मजूर उत्तर प्रदेशकडे रवाना
Just Now!
X