संदीप आचार्य 
मुंबई: मुसळधार पाऊस व करोनाची पर्वा न करता जंगलातून वाट तुडवत ते शिक्षक चालले होते आपल्या विद्यार्थ्यांच्या दारात… त्यांचं भविष्य घडावं यासाठी… त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या घरातील अठराविश्व दारिद्र्य पाहून त्यांचं ह्रदय पिळवटून निघाले तर आपल्या मुलाचे मास्तर आपल्या घरात आल्याची कृतकृत्य भावना अशिक्षित पालकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

देशातील शिक्षण क्षेत्रातील एक आगळावेगळा प्रयोग म्हणावा लागेल. शिक्षणातील एक नवा इतिहास आदिवासी विभागातील अधिकारी व शिक्षकांनी एकदिलाने घडवला आहे. करोनाच्या काळात भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रगत देशातील शाळा बंद असताना महाराष्ट्रात आदिवासी विभागाने एक अभिनव प्रयोग केला आहे. थेट मुलांना त्यांच्या घरी जाऊन शिक्षक मार्गदर्शन करत आहेत. गावतील काहींचे सहकार्य घेतले आहे एवढेच नव्हे तर बारावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे हजारो आदिवासी विद्यार्थी आपल्या गावातील, पाड्यावरील आपल्या छोट्या भावंडांनी शिकावे यासाठी जमेलतशी मदत करत आहेत. श्रीकृष्णाने गोवर्धन आपल्या करंगळीवर उचलला आणि गोपाळांनी आपल्या काठ्यांनी साथ दिल्याची आठवण व्हावी, असा हा अभिनव प्रयोग आहे.

महाराष्ट्रात सुमारे ५०० शासकीय आदिवासी आश्रम शाळा आहेत तर ५०० अनुदानित आश्रमशाळा, २५ एकलव्य शाळा आणि ४८१ वसतीगृहातील जवळपास पाच लाख विद्यार्थी या शिक्षण घेत आहेत. मार्च मध्ये करोनाची साथ सुरु झाली आणि देशात लॉकडाऊन जाहीर केला गेला. देशभरात करोनाची साथ लक्षात घेऊन शाळा उघडण्याचे आजही टाळण्यात आले आहे. शहरी भागात इ-लर्गिंनचे प्रयोग सुरु झाले. त्यातून अनेक भागात शाळा चालवल्याही जात आहेत. पण ग्रामीण त्यातही राज्याच्या १६ जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करणे हे एक आव्हान होते. अनेक भागात वीजेचा पत्ता नसल्याने तसेच शाळेत येणे सुरक्षित नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय करायचे हा प्रश्न आदिवासी विभागापुढे आवासून उभा होता.

शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक असलेले आदिवासी विभाग विकास आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी यावर करोना काळात वेगवेगळ्या प्रकारे विचार केला. यासाठी आदिवासी शिक्षण विभागातील तज्ज्ञ, शिक्षण क्षेत्रातील अन्य तज्ज्ञ काही मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा करून एक योजना तयार केली, ‘अनलॉक लर्निंग’. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठ्यपुस्तक पाठविण्याबरोबरच अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पनेवर आधारित कार्यपुस्तिका, विद्यार्थ्यांमधील सृजनशील व कलात्मकतेला वाव देणार्या कृतीपुस्तिका तसेच शैक्षणिक साहित्याचे किट तयार करून थेट त्यांच्या घरी हे साहित्य पोहोचविण्याचा निर्णय घेतला. या सर्वांचे योग्य नियोजन करण्यासाठी विषयावारी ११ कोअर टिम तयार करण्यात आल्या. या पथकांनी आपापल्या विषयांची जबाबदारी सर्वार्थाने घेतल्याचे आदिवासी विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकार्यांनी सांगितले. यात शैक्षणिक साहित्य निर्मिती, वितरण, सपोर्ट गट, मार्गदर्शक व मदत गट, शिक्षक प्रशिक्षण, स्थानिक सहाय्य असे अनेक मुद्दे होते. १ जून ते २५ जूनपर्यंत ही सर्व कामे पूर्ण झाली. प्रथमच आदिवासी विभागातील सर्वजण एकदिलाने कागदी घोडे न नाचवता थेट कामात एका जिद्दीने सहभागी झाल्याचे पाहायला मिळते. हे सर्व श्रेय डॉ. किरण कुलकर्णी यांचे असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

यापूर्वीही आदिवासींच्या शिक्षणासाठी त्यांनी काही आगळे प्रयोग केले आहेत. आज २५ मुलांमागे एक शिक्षक असे नियोजन आम्ही केले असून घरोघरी जाऊन करोनाबाबतची सर्व काळजी घेऊन आमचे शिक्षक विद्यार्थींना मार्गदर्शन करत आहेत. जवळपास ९५ टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक घरी पोहोचविण्यात आली आहेत. ४५ टक्के गावांपर्यंत गावपातळीवर आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी मदत यंत्रणा उभी केली आहे. आदिवासी विभागाच्या ४९१ हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या जवळपास ५४ हजार विद्यार्थ्यी जे ११ ते पदवीचे शिक्षण घेत आहेत त्यातील काही हजार विद्यार्थी आज या योजनेत आम्हाला मदत करत आहेत. आपल्या गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यात हे विद्यार्थी मदत करत आहेत. आदिवासी आश्रमशाळेतील जवळपास साडेचार हजार शिक्षक जमेल तसे करोना व पावसाचा सामना करत आदिवासी गावात व वस्ती- पाड्यावर जाऊन विद्यार्थ्याला मार्गदर्शन करत आहेत. ज्या गावांमध्ये वीज व अत्याधुनिक यंत्रणा आहे तेथे इ-लर्निंगचा वापर केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

थेट निसर्गाच्या सानिध्यात, स्वत: च्या घरात, पालकांच्या साक्षीने, शिक्षक व गावाचा सहभाग आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांच्या मदतीमधून पाच लाख आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य करोनाच्या लढाईत शिक्षणाअभावी खोळंबू नये यासाठी केलेला हा प्रयोग देशाच्या शिक्षण इतिहातील आगळा प्रयोग म्हणावा लागेल. जवळपास १५ हजार खेडोपाडी व त्यातील लोकांना सहभागी करून आदिवासी शिक्षणाचे एक मूलभूत काम आम्ही सुरु केले याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांचे
वतावरण व पार्श्वभूमी यांचा उपयोग करून शिक्षणाशी जोडण्याचा हा वेगळा प्रयोग आहे जो देशात प्रथमच होत असेल.

ऑगस्ट अखेरीस या अभिनव प्रयोगात आदिवासी विभाग, शिक्षक, गावातील लोक व वरिष्ठ विद्यार्थ्यांसह आश्रमशाळेतील आमच्या पाच लाख मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी ५५ ते ६० हजार लोक सज्ज झालेले असतील, असे डॉ. किरण कुलकर्णी यांनी सांगितले.