शिक्षकाच्या प्रयत्नाने ७५० रुग्णांना रक्तद्रव; १६ रक्तदान शिबिरांचे आयोजन

वाडा : गेली २० वर्षे रुग्णमित्र म्हणून काम करणारे किरण थोरात या वाडा शहरातील शिक्षकाने करोनाच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपत ७५० जणांना रक्तद्रव (प्लाझ्मा) मिळवून देऊन त्यांचा जीव वाचविला आहे, तर १६ रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरजूंना रक्त उपलब्ध करून दिले आहे. त्यांनी स्वत: ८९ वेळा रक्तदान केले आहे.

पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात  विनाअनुदानित तत्त्वावर क्रीडा शिक्षक म्हणून अल्पशा पगारावर काम करणारे किरण थोरात हे गेल्या अनेक वर्षांंपासून रुग्णमित्राचे काम करीत आहेत.  सध्या दुसऱ्या लाटेत आलेल्या करोनाने सर्वत्रच थैमान घातले आहे.

रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्ण दगावत आहेत. आपापल्या रुग्णाला वाचवण्यासाठी अनेक नातेवाईक  प्राणवायू, रेमडेसिविर इंजेक्शन तसेच प्लाझ्मासाठी धावपळ करताना दिसत आहेत. एवढे सारे प्रयत्न करूनसुद्धा या सुविधा मिळणे कठीण होत आहे.  मात्र या कठीण काळात करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या व्यक्तीमध्ये वाडय़ासारख्या ग्रामीण भागातील ५० वर्षीय किरण थोरात यांचे नाव समोर येत आहे.

राज्यातील अनेक रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांना प्लाझ्माची गरज मोठय़ा प्रमाणात भासत आहे.  थोरात हे विविध कोविड उपचार केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन तसेच काही कोविड उपचार केंद्रांतील  वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कोविडवर यशस्वी मात केलेल्या रुग्णांचा पत्ता, संपर्क क्रमांक व रक्त गट मिळवीत आहेत व ज्या कुणा रुग्णाला ज्या रक्तगटाच्या  प्लाझ्माची आवश्यकता आहे, त्यासाठी कोविडवर मात केलेल्या रुग्णांशी समाज माध्यमातून संपर्क साधत आहेत. गेल्या वर्षभरात किरण थोरात यांच्या प्रयत्नातून ७५० रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध झाला आहे.  तसेच या करोना काळात १६ रक्तदान शिबिरे  त्यांनी आयोजित करून वैयक्तिरीत्या ३०० जणांना  रक्त उपलब्ध करून दिले आहे. गेल्या वीस वर्षांंत थोरात यांच्या गेल्या वीस वर्षांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम मी करीत आहे. आपल्या छोटय़ाशा प्रयत्नातून एखाद्या रुग्णाचा प्राण वाचला तर हे समाधान माझ्यासाठी खूप मोठे आहे.

किरण थोरात, रुग्णमित्र, वाडा