ग्रीन कन्सेप्टनुसार बांधण्यात आलेली जिल्हय़ातील पहिलीच सरकारी इमारत आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्याच विभागीय कार्यालयासाठी ही इमारत बांधली असून, पर्यावरणपूरक ग्रीन कन्सेप्टसह एकूणच वेगळय़ा शैलीत बांधलेली ही इमारत शहरात वैशिष्टय़पूर्ण ठरेल.
औरंगाबाद रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सध्याच्या विभागीय कार्यालयाच्या अलीकडेच ही ग्रीन बिल्डिंग बांधण्यात आली आहे. पूर्णपणे गोलाकार रचना असलेल्या या इमारतीची नैसर्गिक प्रकाश आणि हवा ही मुख्य संकल्पना आहे. गोलाकार ११० फूट व्यासाची ही दोनमजली इमारत आहे. महिन्यानुसार सूर्याच्या वेळांचा अभ्यास करून त्यानुसार इमारत आणि खिडक्यांची रचना करण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेंबर या  प्रत्येक महिन्यात सकाळ-दुपार-संध्याकळ सूर्याची दिशा कशी असते याचा अभ्यास करून ही रचना केल्यामुळे सूर्यकिरणे थेट इमारतीत येत नाहीत, अधिकाधिक सूर्यप्रकाश मात्र आत येतो. शिवाय पुरेशी हवाही आत येते. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या फिन्स बसवण्यात आल्या आहेत. सूर्याच्या दिशेनुसार या फिन्सची दिशा बदलते. हेच या इमारतीचे प्रमुख्य वैशिष्टय़ आहे. कोणताही ऋतू व दिवसाच्या कुठल्याच वेळी थेट सूर्यप्रकाश आत येणार नाही, मात्र हवा आत येईल अशी ही रचना आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत इमारतीत दिवे लावावेच लागणार नाहीत, अशा पद्धतीने सूर्यप्रकाश येईल.
इमारतीवरील घुमटही (डोम) वैशिष्टय़पूर्ण आहे. एकतर त्याचा भव्य आकार आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची रचना. ६० फूट व्यास आणि २० फूट उंच अशी या घुमटाची रचना आहे. त्यावर वरच्या बाजूला टबरे व्हेंटिलेटर बसवण्यात आले आहे. त्याचे वैशिष्टय़ असे आहे, की बाहेरची शुद्ध आणि थंड हवा त्यातून सतत इमारतीत येत राहील, इमारतीतील गरम हवा वर खेचून ती बाहेर फेकली जाईल. जेणेकरून दिवसाच्या कोणत्याही वेळेस आतमध्ये नैसर्गिकरीत्या बाहेरच्या वातावरणानुसार थंड हवा खेळती राहील याची काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी इमारतीच्या भिंतींची रचनाही अपारंपरिक आहे. त्यांची रुंदी अधिक आहे आणि त्यासाठी वापरलेल्या विटा फ्लाय अ‍ॅश म्हणजेच पर्यावरणपूरक आहेत. या भिंतींना प्लॅस्टर करण्यात आलेले नाही, त्यामुळे त्यांची बाहेरची उष्णता शोषण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
रेनवॉटर हार्वेस्टिंग हे या इमारतीचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. इमारतीचा घुमट आणि छतावर पडणारे पावसाचे पाणी भूमिगत हौदात साठणार आहे. या पाण्यासाठी तब्बल २ लाख लीटरचा हौद येथे बांधण्यात आला आहे. ग्रीन कन्सेप्ट ही आता राज्य सरकारने स्वीकारलेली नवी वास्तुरचना असून नगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हय़ातील अशा कामाची सुरुवात त्यांच्याच कार्यालयापासून केली. या विभागाचे अधीक्षक अभियंता हरीश पाटील यांनीच्या त्यासाठी पुढाकार घेतला. कार्यकारी अभियंता अशोक खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता एच. बी. लव्हाट यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले. मनोज जाधव हे या इमारतीचे वास्तुविशारद आहेत.