पालघर तालुक्यातील सफाळे उसरणी येथे वास्तव्य करणाऱ्या एका 50 वर्षीय नागरिकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला गेल्या तीन दिवसांपासून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात देखरेखीसाठी व उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

ठाणे वागळे इस्टेट येथे काम करणारी ही व्यक्ती काही दिवसांपासून उसरणी व सफाळे येथे वास्तव्य करत होती. तसेच त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी सफाळे आरोग्य केंद्र इतर खाजगी वैद्यकीय आस्थापनांमध्ये भेट दिली होती. करोना संसर्गाचे लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. मात्र तीन दिवसांपासून त्यांच्या तपासणीचा अहवाल प्रतीक्षेत असल्याने त्याबद्दलचे निश्चित निदान झाले नव्‍हते. त्यांना करोना संसर्ग झाल्याचे आज निश्चित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

काल सायंकाळपासून आजाराची लक्षणे अधिक प्रमाणामध्ये दिसू लागली. त्याचप्रमाणे आज सकाळपासून त्याची प्रकृती गंभीर झाल्याने पालघर मधील वैद्यकीय आस्थापनातील अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली होती. दरम्यान सायंकाळी उशिरा त्याचे निधन झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. या व्यक्तीचा प्रवासादरम्यान तसेच गावातील वास्तव्यादरम्यान अनेकांशी संपर्क आला असल्याने आगामी काळात अनेकांचे विलगीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मृताच्या जवळच्या नातेवाईकांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

करोनाग्रस्तांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारतर्फे केले जात आहेत. अशात महाराष्ट्राची चिंता आणखी वाढली आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ३०२ झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.