पूर्व विदर्भात उद्भवलेल्या पूर परिस्थितीवरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. “पूर्व विदर्भातील पुराचे संकट अतिशय गंभीर असून हे अस्मानी पेक्षा मानवनिर्मीत जास्त आहे. यात शासन व अधिकाऱ्यांचा दोष जास्त आहे. नागरिकांना पूर्वसूचना देवून गोसीखुर्दचे पाणी सोडले असते, तर घरांचे व शेतीचे नुकसान झाले नसते.” असे राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

तसेच भाजपा सरकारच्या काळात कोल्हापूर, सांगली भागात उद्भवलेल्या पुरादरम्यान दिनांक २९ ऑगस्ट २०१९ रोजी मदतीसंबंधीचा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. तो तसाच लागू करावा, त्यातील मदतीच्या रकमेत वाढ करावी, अशी मागणी देखील आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

ब्रम्हपूरी तालुक्यातील बेलगांव, बेटाळा आणि पारडगांवला भेट देत पुरपरिस्थीतीची मुनगंटीवार यांनी पाहणी करून, पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार किर्तीकुमार भांगडीया, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे उपस्थित होते.

शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला असल्याने १० हजार रूपयांची मदत करावी, शेती वाहून गेल्याने रोजगार हमी योजनेचे विशेष अभियान राबविण्याची आवश्यकता आहे. पुरग्रस्त भागात भाजपातर्फे मदतकार्य सुरू असून भारतीय जनता पार्टी पुरग्रस्त नागरिकांच्या पुर्णपणे पाठीशी असल्याचेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.