अर्जुन खोतकर यांच्याशी चर्चा; आश्वासन पाळले नाही तर पुन्हा आंदोलन

शेतीकरी व शेतीसंबंधित विविध मागण्यांसाठी पुणतांब्यातील कृषिकन्यांनी सुरु केलेले अन्नत्याग आंदोलन आज, शनिवारी सहाव्या दिवशी, कृषी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर नगर शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयात मागे घेतले. या कृषिकन्यांची येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली जाईल व त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री खोतकर यांनी दिले. तर, हे आश्वासन पाळण्याची जबाबदारी आता मंत्र्यांवर आहे, त्याप्रमाणे कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, उपोषण मागे घेतले याचा अर्थ लढाई संपलेली नाही, असा इशारा उपोषणकर्ती कृषिकन्या निकिता जाधव हिने स्पष्ट केले.

‘देता की जाता’ असा इशारा देणारे आंदोलन निकिता जाधव, पूनम जाधव, शुभांगी जाधव या कृषिकन्यांनी पुणतांब्यात सुरु केले होते. उपोषणाचा आजचा सहावा दिवस होता. उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने चौथ्या दिवशीच शुभांगी जाधव हिला नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. तर निकिता जाधव व पूनम जाधव या दोघींना पोलिसांनी बळाचा वापर करत पुणतांबा येथून आज मध्यरात्री उचलून आणून रुग्णालयात दाखल केल्याचा आरोप केला जात आहे. शेतक ऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार पिकाला हमी भाव द्या, दुधाला लिटरमागे ५० रुपये भाव द्या, शेतीसंबंधी वस्तुंवरील जीएसटी रद्द करा आदी मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले होते.

कालच, पालकमंत्री राम शिंदे यांनी या कृषिकन्यांची भेट घेतली, मात्र त्यांची शिष्टाई सफल झाली नाही. तत्पूर्वी या उपोषणकत्यरंची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही भेट घेतली होती, मात्र तोडगा निघाला नव्हता. आज रुग्णालयात राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांचे नातू व पुणे जि.प. सदस्य रोहित पवार व स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत पाठिंबा दिला, तसेच पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कृषी राज्यमंत्री खोतकर यांनी या कृषिकन्यांची रुग्णालयात भेट घेतली. येत्या दोन दिवसांत मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घडवून आणली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले, त्यानंतर कृषिकन्यांनी त्यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण मागे घेतले.

आपल्याला पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले असले तरी मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेत आहे, आता चर्चा घडवून आणून मागण्या सोडवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे, उपोषण मागे घेतले याचा अर्थ लढाई संपलेली नाही,  पुढील लढाईसाठी येथून बाहेर पडायचे आहे, मागण्या मान्य झाल्या नाहीतर लढाई सुरुच राहील, असे निकिता जाधव हिने सांगितले.