यवतमाळमधील दारव्हा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुभाष दुधे (वय ४८) यांची भरदिवसा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. रविवारी सकाळी १० वाजता बारीपुरा येथे ही हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयित आरोपी संदीप तोटे पसार झाला आहे.
सुभाष दुधे यांची हत्या करण्याआधी आरोपींनी त्यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोरांनी प्रथम दुधे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला आणि नंतर दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. दुधे आणि तोटे यांच्यात पूर्वीपासून वाद आहे. यापूर्वीही त्यांची अनेकवेळा भांडणे झाली होती.
भरदिवसा ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी दारव्हा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2018 3:25 pm