विरार : वसई-विरार शहराबरोबर आता ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार वाढत असल्याने अर्नाळा ग्रामपंचायतीने चौथ्यांदा कडक टाळेबंदीचे निर्देश दिले आहेत. ही टाळेबंदी ही ३० जूनपासून पुढील आदेश मिळेपर्यंत लागू करण्यात आली आहे. याच बरोबर ग्रामपंचायत परिसराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून या परिसरात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही आहे.

वसई-विरारच्या ग्रामीण भागात करोनाने शिरकाव केला आहे. त्यात विरारचा अर्नाळा परिसर हा करोनाचे केंद्रबिंदू ठरत असल्याने अर्नाळा ग्रामपंचायतीने ३० जूनपासून अनिश्चित काळासाठी कडक टाळेबंदीचे आदेश लागू केले आहेत. ही या परिसरातील चौथी टाळेबंदी आहे. या अगोदर तीन वेळा अशाच प्रकारची टाळेबंदी लागू करण्यात आली होती, पण टाळेबंदी उठताच नागरिकांचा संचार वाढत असल्याने करोना रुग्णाची संख्या वाढत आहे.

ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार मागील १० दिवसात ३४ रुग्ण या परिसरात आढळून आले आहेत. तर एकूण रुग्ण संख्या ५७ वर पोहेचली आहे. यात ३ जण मयत असून ३५ जण बरे झाले आहेत. तर अजून १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे ग्रामपंचायतीने टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील नाळेकर पाडा, कोळीवाडा, बंदरपाडा, एस टी पाडा, हे करोनाचे हॉटस्पॉट केंद्र आहेत. या टाळेबंदीच्या पूर्ण बंद काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील, तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते सकाळी १० असे २ तासच सम-विषम प्रमाणे चालू राहतील. तसेच या काळात पर्यटनावरसुद्धा बंदी घातली आहे. ँपर्यटकांनी सागरी किनारी फिरण्यास येऊ नये, असे आवाहन  ग्रामसेवक पंकेश संखे यांनी  केले आहे.