लोकसत्ता प्रतिनिधी
अकोल्यात मुंबईवरून बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात दाखल झालेल्या एका ८ वर्षीय मुलीचा करोना तपासणी अहवाल आज, गुरुवारी सकारात्मक आला. विशेष म्हणजे मुंबईतच त्या मुलीचे नमुने घेऊन तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर ती मुलगी आपल्या पालकांसह खासगी वाहनाने बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाल्यावर आज सकाळी तिचा करोना तपासणी अहवाल मुंबईत सकारात्मक आला. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील ८ वर्षीय मुलगी पहाटे खासगी वाहनाने मुंबई येथून घरी आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. ही मुलगी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या पोर्टलवर करोना सकारात्मक दर्शविण्यात आली आहे. ही मुलगी मुंबई येथील रुग्णालयात उचाराकरीता दाखल होती. गत काही महिन्यांपासून तिच्यावर किडनीच्या आजारावर उपचार करण्यात येत होते, अशी माहिती आहे. त्या मुलीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत करोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या नमुन्याचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच मुलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर ती मुलगी पालकांसह आज पहाटे बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाली. त्या मुलीचा मुंबई येथेच करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला.

या मुलीला बुलडाणा येथे दाखल करण्यात आले आहे. या मुलीच्या संपर्कातील १३ जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली. करोना तपासणी अहवाल प्रलंबित असतांना त्या मुलीला मुंबई येथील रुग्णालयातून सुटी दिलीच कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात बुलडाणा प्रशासनाने संबंधित रुग्णालयाला पत्र पाठवून विचारणा केल्याची माहिती आहे.

१७ अहवाल नकारात्मक
बुलडाणा जिल्ह्यातील १७ अहवाल आज नकारात्मक आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर २३ जण करोनामुक्त झाले. सध्या जळगांव जामोद येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णावर उपचार सुरू आहेत. २२ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असून, आतापर्यंत एकूण ६६३ अहवाल नकारात्मक आले आहेत.