मोदी सरकारने दिलेला एकही शब्द पाळला नाही. नोटाबंदी केली पण काळा पैसा संपला नाही. कर्जमाफी केल्याचं जाहीर केलं पण ती झालीच नाही. तरूणांना रोजगार दिल्याचे सांगितले पण तरूणांना रोजगार नाही हे भयंकर वास्तव आहे सगळ्या आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरलं आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी परळी येथे झालेल्या सभेत केली. एवढंच नाही तर त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचंही कौतुक केलं. मी अनेकदा बीड जिल्ह्यात आलो आहे, मात्र गेल्या पन्नास वर्षातल्या कारकिर्दीली ही मोठी राजकीय सभा आहे. धनंजय मुंडे यांनी ही सभा आयोजित केली आहे असं म्हणत शरद पवार यांनी मुंडे यांचंही कौतुक केलं.

धनगर समाजाला आरक्षणाचा शब्द दिला मात्र अजून त्याबाबत निर्णयच झालेला नाही, झाली ती फक्त फसवणूक झाली. मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिले मात्र हा प्रश्न न्यायालयात अडकवून ठेवला आहे, असं म्हणत शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात राज्य सरकारचाही समाचार घेतला. जात-धर्माच्या नावावर भारतीय जनता पक्षाकडून विद्वेष वाढवण्याचं काम सरकार करतं आहे . आता वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा होतो आहे, त्यावरून राजकारण सुरू केलं जातं आहे . सचिन तेंडुलकर ,गावसकर यांनी खेळण्यास बंदी घालू नये असे म्हटले तर त्यांच्यावर पाकिस्तान धार्जिणे असल्याचा आरोप सुरू केला आहे .

राज्यात दुष्काळ आहे, गुरे उपाशी आहेत. पिकं करपली आहेत मात्र बीड जिल्ह्यात गुरे ढोरे बाहेर जात आहेत. इथे एकही छावणी सुरू केली नाही. कुठेही शेतकऱ्याला मदत नाही आम्ही छावणी सुरू करून जनावरे जगवली. या प्रश्नावरून अधिवेशनात आमचे सदस्य आवाज उठवतील. या सरकारला घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही असाही निर्धार शरद पवारांनी व्यक्त केला. परळी या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शरद पवारांनी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की,आम्हाला तुरुंगाची भीती नाही. मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं आहे. मी जामिनावर आहे असे तुम्ही म्हणता मी भ्रष्टाचार केला असे तुम्ही म्हणता मात्र तुमच्या पक्षातले अनेक जण खून पाडणारे आहेत त्याचं काय? असा प्रश्न यावेळी भुजबळ यांनी विचारला. इतकंच नाही तर पुलवामात हल्ला झाला तेव्हा आमचे मुख्यमंत्री मातोश्रीवर युतीच्या वाटाघाटी करत होते अशीही टीका त्यांनी केली.