हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल असं आश्वासन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. तसंच या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांच्या दुःखात काँग्रेस पक्ष सहभागी असल्याचंंही त्यांनी म्हटलं आहे. हिंगणघाट येथील पीडितेचा आज सकाळी मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान आज सकाळी तिचा मृत्यू झाला. हा मृत्यू नाही तर हत्याच आहे अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणातील आरोपीला दयामाया दाखवली जाणार नाही असं म्हटलं आहे. आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

पीडित मुलीचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल असंही आश्वासन बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पीडितेच्या मृत्यूनंतर संताप व्यक्त करत आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच खरी पीडितेला श्रद्धांजली असल्याचं म्हटलं होतं. “हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही, ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना आहे,” असंही ते म्हणाले.