20 October 2020

News Flash

जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण होऊ दे; मुख्यमंत्र्यांचं विठ्ठला चरणी साकडं

आपल्या कामांच्या यशापयशाचे मुल्यमापन जनता करेल, त्यामुळे विठ्ठलरुपी जनतेची सेवा करण्याकरीता पाच वर्षांसाठी पुन्हा संधी मिळेल याची आशा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठलाची पुजा केली.

राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात तसेच बळीराजाचे कल्याण व्हावे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्जन्यमान चांगले व्हावे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी आज विठ्ठला चरणी घातले. परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी अहमदपूरच्या वारकरी चव्हाण दाम्पत्याला या महापूजेचा मान मिळाला.

सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री सपत्नीक मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी विठ्ठल मंदिरात दाखल झाले. त्यानंतर २ वाजून २५ मिनिटांनी पूजेला सुरुवात झाली, पुढे दीडतास मंत्रोच्चाराने ही पूजा चालली. परंपरेप्रमाणे दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळत असतो. हा मान यंदा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या सांगवी सुनेवाडी तांडा गावातील वारकरी दाम्पत्य विठ्ठल चव्हाण आणि प्रयाग चव्हाण यांना मिळाला.

महापूजेनंतर येथे मुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी त्यांचा मंदिर समिती आणि मराठा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षी मला या ठिकाणी येता आलं नाही तरी याची मला खंत नाही. कारण विठ्ठलाचा तसा आदेशच होता की, मी केवळ पंढरपूरात नाही तर तुमच्या मनात आहे त्यामुळे तुम्ही जिथे माझी पुजा कराल तिथे मी आहे. मात्र, त्यामुळे माझ्या वर्षा निवासस्थानी विठ्ठलाची पुजा करण्याची संधी मला मिळाली.

मराठा आणि धनगर समाजासह इतर विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी विठ्ठलाचा आशिर्वाद मिळाला. यासाठी सत्काराची गरज नव्हती कारण मी माझे कर्तव्य पार पाडण्याचे काम केले. आपल्या कामांच्या यशापयशाचे मुल्यमापन जनता करेलच. त्यामुळे विठ्ठलरुपी जनतेची सेवा करण्याकरीता पाच वर्षांसाठी पुन्हा संधी मिळेल याची आशा करतो, अशा शब्दांत त्यांनी पुढील सरकार आपलेच असेल असा विश्वास व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 7:26 am

Web Title: the hopes aspirations expectations of the people of maharashtra cm requested to vitthal aau 85
Next Stories
1 खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द
2 बदली झालेल्या अभियंत्याच्या घरी पालघर नगर परिषदेचे ‘प्रतिकार्यालय’
3 मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
Just Now!
X