गोपीनाथ मुंडे या लोकनेत्याच्या मृत्यूची आणि सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणुकांची रॉ मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भातले ट्विट काही वेळापूर्वीच केले आहे. आज संध्याकाळच्या सुमारास गोपीनाथ मुंडे यांना इव्हीएम घोटाळ्याची कल्पना असल्यामुळेच त्यांची हत्या झाली असा आरोप लंडन येथील एका सायबर एक्स्पर्टने केला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला तेव्हाच तो अपघात नसून घातपात असावा अशी शंका साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होती. त्यामुळे सायबर एक्स्पर्ट सय्यद शुजा यांनी पत्रकार परिषद घेऊन जे गंभीर आणि खळबळजनक दावे केले आहेत त्यामुळे या शंकेला पुष्टीच मिळाली आहे असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत सय्यद शुजा या सायबर एक्स्पर्टने केलेला खुलासा धक्कादायक आहे. स्व. मुंडे यांचा मृत्यू झाल्याच्या दिवसापासूनच हा अपघात आहे की घातपात असा संशय आम्हाला होता आणि आजही तो कायम आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आणि इव्हीएम घोटाळ्याची चौकशी रॉ मार्फत करण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.