‘आरटीई’ प्रवेशांसाठी आज अखेरचा दिवस

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत अद्यापही २२ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी शुक्रवारी (१० मे) अखेरचा दिवस आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत ८ एप्रिलला जाहीर झालेल्या पहिल्या सोडतीमध्ये राज्यभरातील ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रवेशासाठी पहिल्यांदा २६ एप्रिलपर्यंत, त्यानंतर ४ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र,  एकूण प्रवेशांच्या जेमतेम निम्मेच प्रवेश झाल्याने पालक आणि काही संघटनांनी प्रवेशांसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक सुनील चौहान यांनी १० मेपर्यंत मुदतवाढ जाहीर केली. दुसऱ्यांदा मुदतवाढ दिल्यानंतर अद्याप २२ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. प्रवेश अर्जातील तांत्रिक चुकांमुळे  संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज बाद न करता त्यांना पुढच्या फेरीत अर्जात दुरुस्तीची सुविधा देण्याची मागणी अनेक संघटनांकडून करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून पालकांना अर्जात दुरुस्ती करू देण्याबाबत विचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.