वीरशैव लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून तो हिंदू धर्मातीलच एक पंथ असल्याने त्याला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे राज्य शासनाने गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म तसेच अल्पसंख्यांक दर्जा मिळावा या मागणी संदर्भात गुरुवारी विधानसभेत लेखी प्रश्न विचारण्यात आला होता, त्याला उत्तर देताना अल्पसंख्यांक मंत्री विनोद तावडे यांनी सरकारची भुमिका स्पष्ट केली.

गेल्या काही काळापासून लिंगायत समाजातील एका गटाकडून समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची मागणी पुढे येत आहे. त्यासाठी राज्यात अनेक आंदोलनेही करण्यात आली आहेत. कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, काँग्रेसने लिंगायत समाजला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही मोठी संख्या असलेल्या या समाजाने स्वतंत्र धर्माची मागणी केली आहे. मात्र, या समाजातील दुसऱ्या गटाकडून याला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला.

तावडे म्हणाले, वीरशैव लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून तो हिंदू धर्माचा एक पंथ असल्याचे २०१४ मध्ये केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाने सांगितले होते. त्यामुळेच २०११ रोजी झालेल्या जणगणनेतही या समाजाची स्वतंत्र नोंद करण्यात आली नव्हती. याचा दाखला देताना स्वतंत्र धर्माच्या प्रस्तावानुसार, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देता येणार नाही.