प्रबोध देशपांडे, लोकसत्ता
अकोला : सापांच्या जीवदानासाठी झटणाऱ्या राज्यातील हजारो सर्वमित्रांचा जीव कायम धोक्यात असतो. त्यांना ना विमा संरक्षण, ना मानधन. तरीही ते जीवावर उदार होत सापांना वाचवण्यासोबतच समाजात जनजागृतीचे कार्य अविरत करीत असतात. शासन दरबारी मात्र १५ वर्षांपासून सर्पमित्रांच्या मागण्या बेदखल असून, त्यासाठी त्यांचा लढा सुरूच आहे.

साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगाचा धरकाप उडतो. काही वर्षांअगोदरपर्यंत कुठेही साप दिसला की अंधश्रद्धा किंवा भीतीपोटी त्याला मारून टाकण्याचे प्रमाण मोठे होते. वन्यप्राण्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्या सर्पमित्रांनी समाजात जनजागृती केली. सापाला मारण्याऐवजी आम्ही पकडून त्याला जंगलात सोडू, असे सांगून सर्पमित्रांनी जीवसृष्टीसाठी समाजाचे मन परिवर्तन केले. गत १५ ते २० वर्षात हळूहळू सर्पमित्रांची सापांना वाचवण्याची चळवळ वाढत गेली आणि राज्याच्या कानाकोपºयांत सर्पमित्रांचे जाळे तयार झाले. असंख्य सर्पमित्र नियमांचे पालन करीत खऱ्या अर्थाने तळमळीने कार्य करीत आहेत.

सर्पमित्रांना विमा संरक्षण व मानधन देण्याची प्रमुख मागणी आहे. सर्पमित्रांना बिनविषारी तसेच विषारी साप पकडावे लागतात. जीव धोक्यात घालून ते हे कार्य करतात. साप किंवा नागाने चावा घेतल्याने सर्पमित्र गंभीर जखमी होतात. काही वेळा तर सर्पमित्रांना जीवही गमवावा लागतो. ही जोखीम लक्षात घेता सर्पमित्रांचा दहा लाख रुपयांचा विमा उतरविण्याचा आणि सर्पमित्रांना आर्थिक संरक्षण देण्याचा विचार मांडण्यात आला. मात्र, आजतागायत सर्पमित्रांचा विमा उतरविण्यात आलेला नाही किंवा त्याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

अकोल्यातील सर्पमित्र बाळ बाळणे कर्करोगाशी झुंज देतांनाही निरंतर सर्पसेवा बजावत आहेत. सर्पमित्रांच्या मागण्यांसंदर्भात माहिती देतांना ते म्हणाले, राज्यात २००५ पासून सर्पमित्रांना मानधन व विमा संरक्षण देण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. अनेक सर्पमित्र संघटनांनीही याचा पाठपुरावा केला. मात्र, कुठलाही सत्ताधाऱ्यांनी सर्पमित्रांच्या मागण्यांना दाद दिली नाही. २००८ मध्ये जिल्ह्यात सर्पमित्रांची नोंदणी झाली होती. त्यानंतर नोंद झाली नाही. राज्यात सुमारे साडेचार हजार सर्पमित्र निष्ठेने कार्य करीत असून, ते वर्षाकाठी दोन लाखाच्या जवळपास सापांना जीवदान देतात. सर्पमित्रांना विमा संरक्षण व मानधन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
…तर तो गुन्हा
खऱ्या सर्पमित्रांसोबतच सापाला खेळण्याप्रमाणे वागवणारे, सापांची तस्करी, काळ्या बाजारात विक्री, जादूटोण्यासाठी सापाचा वापर करणाºया तथाकथित सर्पमित्रांची संख्याही वाढली. हौशी सर्पमित्रांकडून सेल्फी काढून खेळ करण्याचे प्रकारही होतात. मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्याानुसार तो गुन्हा आहे. साप पकडल्यानंतर सर्पमित्रांनी तातडीने वनाधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक आहे.

राज्यातील बहुतांश सर्पमित्र गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांना मानधन देण्याची गरज आहे. शिवाय ते जीव धोक्यात घालून सेवा देत असल्याने शासनाने विमा संरक्षण दिले पाहिजे. अद्याापपर्यंत या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.
बाळ काळणे, मानद वन्यजीव रक्षक व सर्पमित्र, अकोला.