राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. शिवाय, दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनातून बरे होणाऱ्यांची संख्यी ही नियमीत जास्त आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भातील आदेश शुक्रवारी मध्यरात्री काढण्यात आला आहे. तसेच, करोना परिस्थितीनुसार राज्यातील जिल्हे, महानगर पालिकांची वर्गवारी ५ गटांमध्ये केली गेली आहे. दरम्यान, राज्यात आज तीन महिन्यानंतर प्रथमच सर्वात कमी करोनाबाधित आढळले आहेत. दिवसभरात २१ हजार ७७६ रूग्ण करोनामुक्त झाले असून, १३ हजार ६५९ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ५५,२८,८३४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.o१ टक्के झाले आहे. तर, राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६२,७१,४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,१९,२२४ (१६.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,८८,०२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

‘अनलॉक’चा गोंधळ संपला! मध्यरात्री निघाले आदेश; पाच टप्प्यात हटणार निर्बंध

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी राज्यात पाच टप्प्यात ‘अनलॉक’ केला जाणार असल्याची घोषणा केली होती. कोणत्या टप्प्यात कोणता जिल्हा असेल आणि किती प्रमाणात निर्बंध हटवले जातील, यासाठीचे निकष निश्चित करण्यात आल्याचंही वडेट्टीवार म्हणाले होते. मात्र, त्यांच्या घोषणेनंतर असा निर्णय झाला नसल्याचं सरकारने म्हटलं होतं. हा प्रस्ताव विचारधीन असल्याचं सांगत सरकारने अनलॉकबद्दलची चर्चा थांबवली. पण, या गोंधळावरून सरकार टीकेचं धनी ठरलं. अखेर शुक्रवारी मध्यरात्री सरकारकडून अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत.