राजकारणाच्याही पलीकडे जाऊन माणसे जोडण्यारे गोपीनाथ मुंडे यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय राहिले. त्यातूनच त्यांनी जनतेच्या मनात आणि स्वपक्षात मोठे स्थान निर्माण केले. राज्याचे व देशाचे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या मुंडे यांच्या अचानक जाण्याने मोठी हानी झाली असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
अमृत उद्योग समूहाच्या वतीने आज, रविवारी कारखाना कार्यस्थळावर झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे, अप्पासाहेब कदम, दूध संघाचे अध्यक्ष आर. बी. राहाणे, बाजार समितीचे सभापती अनिल देशमुख, नगराध्यक्ष दिलीप पुंड,  माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे व विश्वास मुर्तडक आदी उपस्थित होते.
या वेळी  थोरात म्हणाले, पक्ष वेगळे असले तरी आमची मैत्री होती. आपल्या अनेक सुखदु:खात ते सहभागी राहिले होते. विलासराव देशमुख व त्याची पक्षविरहित मैत्री उभ्या महाराष्टात लोकप्रिय होती. प्रचंड जनाधार असलेल्या या दोघा दिग्गजांच्या जाण्याने अविश्वसनीय पोकळी निर्माण झाली आहे. राजकारणाबरोबरच सहकारातील त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. त्यांच्या भेटीत पक्षभेद गळून पडत असत. सत्ता कोणाचीही असो, एकमेकांची कामे आम्ही हक्काने करून घेतली. आताही केंद्रात वेगळे सरकार असले तरी राज्यातील ग्रामविकासाची कामे मार्गी लावण्यासाठी मुंडेंसारखा हक्काचा माणूस असल्याचा आधार वाटत होता.
डॉ. तांबे म्हणाले की, निकोप राजकारणाची शिकवण देणा-या मुंडे यांनी बहुजन समाजाचा मोठा नेता म्हणून भाजपवरदेखील प्रभाव टाकला होता. या वेळी हिरालाल पगडाल, सांगळे, कदम, बी. आर. चकोर आदींनी मनोगत व्यक्त केले. माधवराव कानवडे यांनी प्रास्ताविक तर मानदेव काहांडख यांनी सूत्रसंचालन केले.