सावंतवाडी ते कुर्ला (लोकमान्य टिळक टर्मिनस) या मार्गे धावणारी श्री गणपती स्पेशल हॉलिडे एक्स्प्रेस सकाळी सावंतवाडी रेल्वे स्थानकात न आल्याने प्रवाशांनी एकच हंगामा केला. रेल्वे पोलिसांना धक्काबुक्की करीत स्थानक प्रमुखांच्या कार्यालयात घुसून प्रवांशांनी त्यांच्यासमोर प्रश्नांचा भडिमार केला. या प्रवाशांच्या संतप्त भावना पाहून सावंतवाडी पोलीसांना स्थानकात येऊन प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

रेल्वे रद्द झाल्याने वैभववाडी येथे शुक्रवारी प्रवाशांनी गोंधळ घातला होता, त्यापेक्षा जास्त गोंधळ आज सावंतवाडी स्थानकावर प्रवाशांनी घातला. सावंतवाडी स्थानकातून मुंबईकडे जाणारी श्री गणपती स्पेशल हॉलिडे एक्स्प्रेस सकाळी ९ वाजता मुंबईकडे जाण्यास निघणार होती. मात्र, ती स्थानकात पोहोचलीच नाही. रात्री २ वाजता मुंबईहून सुटल्यानंतर ही गाडी सायंकाळी ५ वाजता सावंतवाडी स्थानकात पोहेचेल असे नियोजन करण्यात आले होते. कोकण रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकापेक्षा १० ते १२ तास उशिराने ही गाडी येणार असल्याने प्रवाशी संतप्त झाले होते.

मुंबईत दोन दिवसांपूर्वी झालेला मुसळधार पाऊस आणि दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. त्यामुळे गैरसोय होत असल्याने प्रवासी नाराज आहेत. सायंकाळी सावंतवाडी स्थानकात तीन रेल्वे पोलीस उपस्थित होते. स्पेशल गाडी संध्याकाळी सुटणार असे कळाल्यावर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रवाशांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी प्रवाशांना शांत करण्यासाठी हिंदी भाषिक रेल्वे पोलीस राम बाबू शर्मा गेले तर प्रवाशांनी त्यांना मराठीत बोलण्याचे आवाहन केले. यावेळी अनेकांनी पंतप्रधान, रेल्वेमंत्री आणि कर्मचाऱ्यांबाबत अपशब्द काढत रेल्वे पोलिसांना धक्काबुक्की केली. यावेळी रेल्वे स्थानक प्रमुख एस. व्ही. महाजन यांनाही जाब विचारला गेला. यावर रेल्वे आली तर तत्काळ सोडण्याचे आश्वासन रेल्वेस्थानक प्रमुखांना द्यावे लागले.

मात्र, प्रवाशांचे उग्र रुप पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस, पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्यासह राज्य राखीव पोलीसांच्या तुकडीला रेल्वे स्थानकात पाचारण करावे लागले. त्यांनतर स्टेशन मास्तर आणि रेल्वे पोलिस प्रवाशांच्या तावडीतून सुटले.