एका गुन्हेगाराचा भर रस्त्यावर गुंडाच्या टोळीने पाठलाग करून खून केल्याची थरारक घटना इचलकरंजी येथे सोमवारी घडली. ठार झालेली व्यक्ती बांधकाम मजूर असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करीत एका अल्पवयीन मुलासह सात मारेकऱ्यांना पोलिसांनी अवघ्या तीन तासात अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, रामा कचरु गरड असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो गवंडी काम करीत होता. तर, संतोष उर्फ ऋष्या बाबर, आसिफ शेख, राजेश चव्हाण, किरण वडर, सोहेल शेख, अक्षय कल्ले आणि एक अल्पवयीन मुलगा अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. रामावर यापूर्वी पोलिसांत तीन गुन्हे दाखल आहेत. सोमवारी दुपारी तो मोटरसायकलवरून बाह्य वळण रस्त्याने महासत्ता चौकाकडे जात असताना एका गुंडाच्या टोळीने मोटरसायकलवरुन रामाचा पाठलाग केला आणि कंजारभाट वसाहतीत गाठून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील डोंगरात आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार सायंकाळी पोलिसांनी त्यांना घेराव घालत पकडले. यावेळी आरोपींनी आपण केलेल्या खुनाची कबुली दिली.

अल्पवयीन आरोपीच हत्येच्या कटाचा सुत्रधार?

या खून प्रकरणात पकडण्यात आलेला अल्पवयीन मुलाला एका गुन्ह्यात अटक झाली होती. त्याचे वडिलही मोक्काच्या गुन्ह्यात तुरुंगात आहेत. वडिलांना तुरुंगात धाडणाऱ्यांना धडा शिकवण्याचा त्याचा मनसुबा होता. त्यासाठी त्याने रामा गरड याला मदत करण्यास सांगितले होते. त्यासाठी रामावर दबाव टाकला जात होता. रामाला या भानगडीत पडायचे नसल्याने त्याने पोलिसांना माहिती देईन, असे सांगितले होते. त्यामुळे आपला कट बाहेर उघड होईल या भीतीने सात जणांनी रामाला एकटे गाठून ठार मारले.