मोदी सरकार हळूहळू देशात आणीबाणी आणू पाहतं आहे असं चित्र आहे असं म्हणत कांजूर कारशेडच्या जागेवरुन सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत. कांजूरमार्ग कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारने केलेला दावा धक्कादायक आहे असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. कांजूरमार्ग येथील कारशेडसाठीची जमीन ही महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याच राज्याचा त्या जमिनीवर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करतंय असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्याचे भाजपाचे कटकारस्थान; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“कांजूरमार्गच्या जागेवर केंद्र सरकारने केलेला दावा धक्कादायक आहे. ती जमी महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार राज्याचे अधिकार काढून घेण्याचं काम करतं आहे. त्यांच्या कृतीतून हेच दिसतंय हे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. भाजपाचे नेते कोणत्या आधारावर आमच्यावर टीक करत आहेत? जमीन महाराष्ट्राच्या विकासासाठीच वापरली जाते आहे. या देशात केंद्र सरकार हळूहळू आणीबाणी आणतंय असं चित्र आहे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. मंदिरांचे टाळे तोडू अशी भाषा मी कधीच ऐकलेली नाही. सत्ता नसल्यामुळे भाजपाच्या नेत्यांना काही सुचत नाही. त्यामुळे ते बिचारे असं वागत असतील. कदाचित त्यांचा समतोल बिघडला असावा” असं म्हणत सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे.

आणखी वाचा- भाजपा म्हणजे महाराष्ट्र विकासाच्या झारीतील कमळाचार्य – सचिन सावंत

दरम्यान दिवाळीनंतर लग्नाचे हॉल उघडण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. टप्प्याटप्प्याने हॉल खुले करा, दिवाळीनंतर ते उघडण्यास हरकत नाही मात्र त्याचे बुकिंग करण्याची परवानगी द्या अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केली असल्याचंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.