राज्यात सध्या करोना संसर्ग अधिक झपाट्याने वाढत असून, या दुसऱ्या लाटेमुळे सर्वजण धास्तावलेले आहेत. अनेकांचा हातचा रोजगार गेला आहे, काहींचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. कमाईचे साधन नसल्याने व हाती पैसा नसल्याने अनेकजण नैराश्यात देखील गेल्याचं दिसून येत आहे. मात्र अशा परिस्थितीतही आपली प्रामाणिकता कायम ठेवत व आपल्या कार्यावर निष्ठा ठेवून कार्यरत राहणारे हे समाजासाठी आदर्शवत ठरत आहेत.

असाच एक प्रामाणिकतेचा दाखला देणारा प्रसंग वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशिअलिटी रूग्णालयात घडल्याचं समोर आलं आहे.

येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी वृंदा चौधरी यांनी त्यांना रूग्णलयातील सफाई करताना, एका गादीवरील उशीखाली आढळून आलेले सव्वा लाख रुपये व घड्याळ रूग्णलाय प्रशासनाकडे सुपुर्द केले. नंतर समजले की नुकतेच निधन झालेल्या सुभाष राठी नावाच्या रूग्णाचे हे पैसे होते. संस्थेचे विश्वस्त सागर मेघे यांनी वृंदा चौधरी यांच्या या प्रामाणिकपणाची दखल घेत त्यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले. तर,अधीक्षक डॉ.संदीप श्रीवास्तव, मुख्याधिकारी डॉ.उदय मेघे, कुलगुरू डॉ.राजीव बोरले यांनी व्यक्तिशः त्यांचे कौतुक केले.

आपल्या कामाने संस्थेची विश्वसनीयता वाढली पाहिजे – वृंदा चौधरी
या संदर्भात बोलतांना वृंदा म्हणाल्या की, हे काही फार वेगळे काम नाही, रुग्णालयासाठी आम्ही काम करतो. त्याचा मोबदला घेतो, रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असे संस्थेचे पालक दत्ताजी मेघे यांची शिकवण आहे. आपल्या कामाने संस्थेची विश्वसनीयता वाढली पाहिजे, असे मला वाटते तेच मी केले. माझे सहकारी पण असेच वागतील.