महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १ नोव्हेंबर २०२० आणि २२ नोव्हेंबर २०२० ला होणाऱ्या परीक्षाही रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.

११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने जाहीर केला होता. त्याचवेळी पुढची परीक्षा कधी होईल ते जाहीर करण्यात येईल असं सांगितलं होतं. तसंच पुढच्या परीक्षेची तारीख रद्द होणार नाही असंही स्पष्ट केलं होतं. दरम्यान नोव्हेंबरमध्ये होणारी परीक्षाही रद्द करण्यात यावी अशी मागणी होत होती. आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. विनायक मेटे यांनी ही मागणी लावून धरली होती. आता या परीक्षांच्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येणार आहेत असंही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर ११ ऑक्टोबरला होणारी एमपीएसीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सातत्याने मराठा समाजाकडून होत होती. दरम्यान यासंदर्भातला निर्णय ठाकरे सरकारने ९ तारखेला जाहीर केला. त्यामध्ये ही परीक्षा पुढे ढकलत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातली करोना स्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं ठाकरे सरकारने जाहीर केलं होतं.