विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपाने माझं तिकिट कापलं.. मी रोहिणीताईंसाठी तिकिट मागितलं नव्हतं. मात्र जाणीवपूर्वक त्यांना तिकिट दिलं गेलं. त्यानंतर त्यांना पाडण्यासाठी भाजपातल्याच काही गद्दारांनी काम केलं असाही आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पक्षांतर करा असं मला माझे कार्यकर्ते कायमच सांगत होते. तुम्ही अन्याय सहन करु नका, तुमचा अपमान होतो आहे तो तुम्ही सहन करु नका असं मला कार्यकर्ते सांगत होते. मात्र मी चाळीस वर्षे पक्षात होतो त्यामुळे पक्ष बदलण्याचा विचार नव्हता. मला विनाकारण मंत्रिपदावरुन हटवण्यात आलं. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने माझं तिकिट कापल्यानंतर मला राष्ट्रवादीने दोन दिवस विनंती केली होती की तुम्ही पक्षांतर करा.. आम्ही तुम्हाला तिकिट देतो. मात्र त्यावेळी मी ती ऑफर नाकारली असंही खडसेंनी सांगितलं.

रोहिणी खडसेंना तिकिट देणं ही देखील भाजपाची खेळी होती. रोहिणी खडसेंना पाडण्यासाठी भाजपाच्या गद्दार कार्यकर्त्यांनी काम केलं. त्यासंबंधीचे फोटो, ऑडिओ कॅसेट, सीडी हे सगळं मी दहा महिन्यांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांना दिलं होतं. मात्र या कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. याचाच अर्थ त्यांच्यामागे कुणीतरी उभं होतं हे उघड आहे. या गद्दारांवर कारवाई झाली असती तर मला बरं वाटलं असतं आणि नंतर हे प्रकार वाढलेही नसते. पण या लोकांना कारवाई करायची नाही हे दिसत होतं. मला तिकिट नाकारलं तेव्हाच आपल्याकडे राष्ट्रवादीचा एबी फॉर्म आला होता. मात्र त्यावेळी पक्ष बदलणं मला योग्य वाटत नव्हतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांची मनमानी सुरु होती. मतदार, कार्यकर्ते सगळ्यांनाच हे वाटत होतं की मी पक्ष सोडावा. आजही ८० टक्केंच्या वर लोक म्हणत आहेत नाथाभाऊंनी पक्ष सोडून योग्य निर्णय घेतला.

भाजपामध्ये सामूहिक नेतृत्व आहे. असं असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी प्रवृत्ती घुसली. हम करे सो कायदा हे धोरण त्यांनी राबवलं. मी रोहिणी खडसेंसाठी तिकिट मागितलं नव्हतं. विधानसभेच्या वेळेला ही खेळी करण्याची गरज नव्हती. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर अन्याय केला. असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी प्रवेश दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो कारण त्यांनी माझं राजकीय पुनर्वसन केलं असंही एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.