सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत मंगळवारी दुसऱ्या दिवशीही आवक झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल १५ हजार रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. तर स्थिर दर ४२०० रुपये मिळाला. दिवसभरात कांदा व्यवहारात अकरा कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल झाल्याचे कृषिउत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पाश्र्वभूमीवर बाजारात नव्या कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून कांदा दर तेजीत आहे. सोलापूर जिल्ह्यत साठवणूक करून ठेवलेल्या जुन्या उन्हाळी कांद्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कारण सोलापुरात कांदा साठवणुकीसाठी हवामान पोषक नसते. सद्य:स्थितीत पुणे, नगर, नाशिकसह शेजारच्या मराठवाडा व कर्नाटकातूनही जुन्या कांद्याची सोलापूरच्या बाजारात आवक वाढली आहे. गेल्या महिन्यात कांद्याला कमाल दर अकरा हजारांपर्यंत मिळाला होता. त्यानंतर काल सोमवारी त्यात आणखी भर पडून कांद्याने प्रतिक्विंटल तब्बल १५ हजार रुपये इतका उच्चांकी टप्पा गाठला होता. त्यानंतर मंगळवारी, दुसऱ्या दिवशीही कांद्याच्या दरात अशी तेजी कायम राहून प्रतिक्विंटल १५ हजार रुपये दराने कांदा खरेदी केला गेला. तर स्थिर दरातही वाढ होऊन तो प्रतिक्विंटल ४२०० रुपये होता.

दिवसभरात ३० हजार ६१४ क्विंटल कांद्याची आवक झाली. दरात तेजी कायम राहिल्यामुळे सोलापुरात कांदा आवक होण्याचे प्रमाणही वाढले आहे.