रायगड जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा ३२ वर पोहोचला आहे. यात पनवेल महानगर पालिका हद्दीतील २६ तर उलवे परिसरातील ४  तर उरण मधील २ जणांचा समावेश आहे. यातील तिघांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. चारजण करोनामधून पुर्ण बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यातील ३४७ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ३२ जणांचे अहवाल सकारात्मक(पॉझिटिव्ह) आले. या केंद्रीय सुरक्षा बलातील ११ तर १५ अन्य व्यक्तीचा तसेच पनवेल ग्रामिण आणि उरण मधील एकुण ६ जणांचा समावेश आहे. या सर्वांवर पनवेल, नवीमुंबई आणि मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पनवेल महानगर पालिका हद्दीत  मंगळवारी आणखी तीन नवीन रुग्ण आढळून आले.  खारघर येथील ओला टॅक्सी चालकाच्या संपर्कातील दोघांना तर घोट गावातील एकाला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. अलिबागमधील दोघांचे, पेण मधील एकाचा तर उरण मधील पाच जणांचे अहवाल नकारात्मक आले. जिल्ह्यातील २२ जणांचे अहवाल सध्या प्रलंबित आहेत. उरणमधील आनंदी निवास, राघोबा देवमंदीर, मच्छीमार्केट शिवप्रेरणा इमारत, जेएनपीटी टाउनशिप मधील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.