News Flash

यवतमाळमध्ये करोनाबाधितांची संख्या दीडशेपार; ४२ रूग्णांवर उपचार सुरू

यवतमाळ शहरातील करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे तर ग्रामीण भागात वाढतेय

प्रतिकात्मक छायाचित्र

यवतमाळ शहरातील करोनाबाधितांची संख्या कमी होत असताना ग्रामीण भागात करोना ससंर्ग वाढत आहे. जिल्ह्यातील १६ पैकी सात तालुक्यांमध्ये करोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. यातील बहुतांश रूग्ण हे मुंबईहून परतलेले आहेत. या आठवडाभरात जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या दीडशेपार झाली आहे. यातील १०८ रूग्णांना उपचारानंतर सुट्टी झाली असून ४२ रूग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या १५३ रूग्णांपैकी सर्वाधिक ९९ रूग्ण हे यवतमाळ शहरातील आहेत. तर यवतमाळच्या दोन व्यक्तींवर अनुक्रमे मुंबई व पुणे येथे उपचार झाले आहेत. ग्रामीण भागात उमरखेड तालुक्यात सर्वाधिक २० रूग्णांची नोंद झाली आहे. यात नागापूर, माळेगाव पार्डी, टाकळी या गावातील रूग्णांचा समावेश आहे. यातील तब्बल १३ जण एकाच कुटुंबातील आहेत. तर दिग्रस तालुक्यातील रूई, ईसापूर, मरसूळ या गावांमध्येही १२ करोनाग्रस्त आढळले आहेत. पुसद तालुक्यातील निंबी, हुडी, धुंदी येथे नऊ, महागाव तालुक्यातील मुडाणा येथे पाच, नेरमध्ये चार, दारव्हा येथे एक तर कळंब तालुक्यातील आष्टी येथे एक करोनाबाधित रूग्ण आढळला. या १५३ रूग्णांपैकी १०८ रूग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. सध्या यवतमाळच्या विलगीकरण कक्षात ४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या आठवडाभरात महागाव, उमरखेड आणि नेर तालुक्यातील प्रत्येकी एक अशा तीन रूग्णांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईतून करोना पॉझिटिव्ह रूग्णास घेऊन येणाऱ्या रूग्णवाहिकेच्या वाहन चालकासही संसर्ग झाल्याने त्याच्यावर यवतमाळच्या विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, विलगीकरण कक्षात सेवेत असलेल्या एका परिचारिकेसही करोनाची लागण झाल्याने वैद्यकीय महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. तर नेर येथे ट्रकमध्येच मृतावस्थेत आढळलेल्या नाशिक जिल्ह्यातील ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचाही प्रशासनाने शोध सुरू केला आहे. आज गुरुवारी चार नवीन संशयित भरती झाल्यामुळे सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात ५५ व्यक्ती दाखल आहेत. आतापर्यंत दोन हजार २०८ नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून यांपैकी दोन हजार १९० अहवाल प्राप्त झाले असून १८ अहवाल अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ३९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. संस्थात्मक विलगीकरणात १० तर ४४३ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 6:27 pm

Web Title: the number of corona patient in yavatmal is over one hundred and fifty treatment going on 42 patients aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पालघर : ग्रामीण भागातील पाचशेहून अधिक करोना रुग्णांसाठी सुविधा तयार
2 परदेशातील ४ हजार भारतीय महाराष्ट्रात दाखल; १३०९ नागरिक मुंबईतील
3 सफाई कर्मचारी बनले लिपीक; वसई-विरार महापालिकेतील मोठा घोटाळा उघड
Just Now!
X