मुंबईहून आलेल्या करोनाबाधित रुग्णामुळे बीड  जिल्ह्यात  करोनाचा प्रवेश झाला होता. त्यानंतर जिल्ह्यातील रुग्ण संख्या हळूहळू वाढत गेली व आठ दिवसात मंगळवारी करोनाबाधित रुग्णांची संख्या 55 वर पोहचल्याने येथील नागरिकांची चिंता वाढली आहे.

दरम्यान एका करोनाबाधित रुग्णाने उपचार घेतलेले शहरातील दोन खासगी रुग्णालय व एक तपासणी केंद्र प्रशासनाने बंद केले असुन, संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे.  बहुतांश तालुक्यात  बाहेरुन आलेल्यांमुळे करोनाचा वेढा वाढवल्याचे दिसत आहे.

शेजारील जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असतानाही, बीड जिल्ह्यातील बाधितांची संख्या शुन्यावर होती. टाळेबंदी शासनाने काहीशी शिथील केल्यानंतर मुंबई, पुण्यावरुन आलेल्या  जिल्ह्यात आलेल्यांबरोबर करोनाचा शिरकाव झाला. मागील आठ दिवसात जिल्ह्यात बहुतांश तालुक्यातील ग्रामीण भागात करोनाबाधित सापडले असुन, मंगळवार दि. 26 मे रोजी रात्रीपर्यंत करोना बाधितांची संख्या 55 वर पोहचली. पाटोदा तालुक्यातील एक बाधित रुग्ण 18 मे रोजी बीड शहरातील दोन खासगी रुग्णालयात उपचार घेऊन, एका तपासणी केंद्रात गेला असल्याने, ही तिन्ही ठिकाणं बंद केली आहेत. शिवाय, रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू आहे.

आणखी वाचा- औरंगाबाद जिल्ह्यात 30 नव्या करोनाबाधितांची नोंद, एकूण रुग्ण संख्या 1360 वर

परळी तालुक्यातील हाळंब येथे आलेल्या एका जावयाला करोनाची बाधा असल्याचे समोर आले. तर शिरुर तालुक्यातील बारगजवाडी, पाटोदा तालुक्यातील वाहली येथेही बाहेरुन आलेल्या पाहुण्यांबरोबर करोना आल्याचे उघड झाले.  जिल्हा रुग्णालयात 47 करोना बाधितांवर उपचार करण्यात येत असुन, सहा रुग्णांच्या इच्छेनुसार त्यांना उपचारासाठी पुण्यात पाठवण्यात आले आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील प्रत्येक गावात पुणे, मुंबईतील करोनाची लागण झालेल्या परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक गावाकडे परतले आणि यामुळे करोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले.

आणखी वाचा- Coronavirus: चोवीस तासात ७५ पोलिसांना करोनाची लागण; एकूण संख्या १९६४ वर

जिल्हा रुग्णालयातील दोन करोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले. बुधवारी सकाळी शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह प्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बँड वाजवून आणि कर्मचार्‍यांनी टाळ्या वाजवून दोन्ही रुग्णांना सुट्टी दिली. दोन रुग्णांनी करोनावर मात केल्यामुळे सर्व सामान्य जनतेमधून करोनाची भीती कमी होईल. जिल्हा रुग्णालयातही योग्य उपचार मिळतात हा विश्‍वास अधिक वाढेल. नागरिकांनी भीती न बाळगता नियमांचे पालन करुन करोनाला हरवावे असे मत डॉ.अशोक थोरात यांनी व्यक्त केले.